Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शुभेच्छ दिल्या. या घडामोडींनंतर महाविकास आघाडीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या अस्वस्थेतूनच काँग्रेस नेत्यांची उलट विधाने ऐकू येऊ लागली आहेत. या भेटींवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. दिल्लीत आता बैठकांचा जोर वाढलाय. ज्या बैठका होत आहे त्यातून कुछ तो गडबड है असे म्हणायला स्कोप आहे असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
पवार एकत्र आले तर शिंदेंची गरज संपेल कशी?; अजित पवार-शरद पवार भेटीमागचे नेमके संकेत काय?
भाजपला दुसऱ्याचे घर फोडण्यात आनंद मिळतो त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आसुरी आनंदापोटीच काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न असू शकतो. पुरोगामी विचारांच्या आधारे शरद पवारांनी पूर्ण आयुष्य घालवले. आताच्या परिस्थितीत ते वेगळ्या दिशेने जाण्याचा आजिबात विचार करणार नाहीत असेही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच मविआत मतभेद होते. यात काँग्रेस आणि ठाकरे गटात तर सातत्याने धुसफूस सुरू होती. त्यानंतर आता शरद पवार गटावरही काँग्रेस नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, काँग्रेसमधील एका गटाला मात्र शरद पवार वेगळी भूमिका घेणार नाहीत असेही वाटत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे.
आम्हाला ऑपरेशनची गरज नाही; काँग्रेस नेते भेटत असतात, बावनकुळेंच सुचक विधान
दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचं निमित्त शरद पवारांचा 85 वा वाढदिवस ठरलं. अजित पवार हे खातेवाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला गेले होते. याच दरम्यान त्यांनी काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी धाव घेतली.
अजित पवार यांच्यासोबत पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ देखील उपस्थित होते. याअगोदर दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आजच्या काका-पुतण्याच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय चाललंय? अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरात सुरू आहे.