Download App

वडेट्टीवारांनाच विरोधी पक्षनेता का केलं? बाळासाहेब थोरातांनी खरं काय सांगूनच टाकलं

Balasaheb Thorat : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर विरोधकांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. राष्ट्रवादी फूट पडल्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या घटली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. त्यानंतर काल काँग्रेस पक्षाने काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली.

काँग्रेसमध्ये या पदासाठी नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांसारख्या दिग्गज नेत्यांची चर्चा होती. मात्र या सगळ्यांना डावलून वडेट्टीवार यांनाच पद देण्यात आलं. वडेट्टीवार यांनाच विरोधी पक्षनेता का करण्यात आले, याचे उत्तर काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले. थोरात म्हणाले, विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला होता. सध्या काँग्रेसचे सर्वाधिक 45 आमदार आहेत. काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली आहे. विधानसभेचे अध्यक्षांना आम्ही तसे पत्रही दिले आहे. उद्या त्यांचे नाव घोषित करावे अशी विनंती आम्ही पत्रात केली आहे.

अजितदादा, शरद पवारांना का भेटले नाहीत? राऊतांच्या उत्तराने वाढला संभ्रम

वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर करतील का या प्रश्नावर थोरात म्हणाले, यामध्ये एक पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं. यासंदर्भात आम्ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी हे पत्र काढून घेण्यासाठी तत्काळ कार्यवाही करू असे सांगितले. त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही. आता वडेट्टीवार साहेबांनी विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे हाती घ्यावीत आणि कामाला सुरुवात करावी अशा शुभेच्छा मी त्यांना देतो.

वडेट्टीवार एक ज्येष्ठ सदस्य आहेत. अनेक विभाग त्यांनी सक्षमपणे सांभाळले आहेत. 2019 मध्ये सुद्धा विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याचकडे होते. त्यावेळीही त्यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यावेळच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यांच्यात अनेक नेतृत्व गुण आहेत. सरकारला धारेवर धरण्याचीही त्यांची चांगली क्षमता आहे. त्यामुळे पक्षाने त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे, असे थोरात यांनी सांगितले.

विधीमंडळ नेतेपद माझ्याकडेच राहणार

त्याचपद्धतीने विधीमंडळ काँग्रेस नेते एक पद होते ते माझ्याकडेच होते. हे पद मलाच सांभाळण्यास सांगण्यात आले आहे, असे थोरात म्हणाले. त्यामुळे विधीमंडळाचे नेतेपद आणखी कुणाकडे देण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार सध्यातरी नाही, असे यातून स्पष्ट होत आहे.

आमदार शहाजीबापूंचं टेन्शन वाढणार? संभाजीराजे सांगोल्यात ‘स्वराज्य’ संघटना बांधणार

थोरात-चव्हाण-पटोलेंनी किल्ला लढवला

आमदारांची संख्या जास्त असल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही तसाच दावा करत होते. पण, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कोणाला संधी द्यायची असा प्रश्न होता. काँग्रेसच्या नेहमीच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा फटका याहीवेळी बसला. अंतर्गत गटबाजीमुळे विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित होत नव्हते. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले तरी हा गोंधळ कायम होता. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविनाच विरोधी पक्ष अधिवेशनाला सामोरा गेला. अधिवेशनात काळात काँग्रेस नेते मात्र कमालीचे आक्रमक दिसले. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नाना पटोले या ज्येष्ठ नेते मंडळींनी विरोधकांचा आवाज कायम ठेवला.

Tags

follow us