Barsu Refinery News: सध्या बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांसह विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबईहून बारसूकडे जात असताना तिकडे जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते मात्र राऊत आपल्या भूमिकेवर ठाम होते. राऊत आंदोलकांना भेटण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी राऊतांनी रस्त्यातच ठाण मांडले. त्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, येथे आता पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
बारसु रीफायनरी आंदोलनात मला व माझ्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. pic.twitter.com/aBmzA7OvAg
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) April 28, 2023
बारसू रिफायनरीवरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प करण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. स्थानिक नागरिकही या प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
बारसू येथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, तरीही येथील आंदोलकांची भेट घेण्याचे उद्देशाने येथील स्थानिक खासदार राऊत निघाले होते. पोलिसांनी त्यांना तिकडे जाऊ नये असे सांगितले होते.
मात्र त्यांनी जुमानले नाही. ते आंदोलकांच्या भेटीसाठी निघाले. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राऊत यांच्यासह सुधीर मोरे,विलास चाळके,चंद्रप्रकाश नकाशे, विद्याधर पेडणेकर,रामचंद्र सरवणकर, कमलाकर कदम यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.