ठरलं तर! विधानसभेत ठाकरेंचा तर विधानपरिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता; बैठकीत निर्णय

मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला.

Sharad Pawar

Sharad Pawar

Maharashtra Politics : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळेल इतक्याही जागा विरोधी पक्षांना निवडून आणता आल्या नाहीत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही महाविकास आघाडीला अनेक अडचणी आल्या होत्या. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला. शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यालयात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नव्हतो..स्वतंत्र निवडणुका लढण्यावर राऊत काय म्हणाले?

महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे अनिल परब, सुनील प्रभू, शरद पवार गटाचे जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान आदी उपस्थित होते. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या नावावर सविस्तर चर्चा झाली. काही नावे समोर आली आहेत. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मागील वेळी हे पद काँग्रेसकडे होतं.  परंतु, यंदा काँग्रेसपेक्षा ठाकरे गटाचे जास्त आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या पदावर त्यांचा दावा अधिक बळकट असल्याचे सांगितले जात आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचे या बैठकीत ठरले आहे. याआधी हे पद ठाकरे गटाकडे होते. आमदार अंबादास दानवे या पदावर होते. आता मात्र हे पद काँग्रेसला जाणार आहे. बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांवर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना अन् शरद पवारांची राष्ट्रवादी लवकरच.. बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी झाल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांबाबत निर्णय झाला नव्हता. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाआधी महाविकास आघाडीकडून याबाबत लवकरच  निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते पद कोणत्या पक्षाला द्यायचं हे जवळपास निश्चित झालं आहे. आता या पदांवर कोणत्या नेत्याला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version