Download App

‘याच दबावाने, घिसाडघाईने 20 कामगारांचा बळी घेतला’; ‘समृद्धी’ अपघातांवर ठाकरे गटाचा घणाघात

Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायमच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळ भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत वीस जणांचा मृत्यू झाला. या घटनेवरून आता ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. या मोठ्या दुर्घटनेन वीस गोरगरीब कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, अशा घटनांवर कायमचा उपाय काय, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून सरकारच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. लेखात म्हटले आहे, की समृद्धी महामार्ग सध्याच्या राज्यकर्त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेलही, पण तुमचे हे स्वप्न निरपराध्यांसाठी काळस्वप्न ठरत आहे, त्याचे काय ? राज्यकर्त्यांनी स्वप्न पहायचे आणि त्यांची किंमत निरपराध्यांनी आपल्या मृत्यूने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत घडत आहे.

संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा मर्डर करेन, सुबोध सावजींची खुलेआम धमकी…

सोमवारच्या दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले आहे. राज्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गाचे स्वप्न जरून पहावे. पण, निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू यांमुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला समृद्धी कशी म्हणणार ? अपघातग्रस्त समृद्धी महामार्गाने उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे. या महामार्गाचे कर्ते धर्ते आज राज्याचे मुख्य आणि उपमुख्य आहेत. त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे काय असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

या महामार्गाचा अपघाताचा महामार्ग असा बदलौकीक होत आहे. नावात समृद्धी असलेल्या महामार्गाबाबत ही परिस्थिती ना सरकारसाठी भूषणावह आहे ना जनतेसाठी सुखावह. परंतु, तरीही महामार्गाचे उर्वरित 200 किलोमीटर कामाचे घोडे पुढे दामटले जात आहे. ज्या सरलांबे येथील  पुलावर सोमवारची दुर्घटना घडली त्या पुलाच्या कामाच्या बाबतीतही सरकारची हीच घिसडघाई सुरू असल्याचा आरोप आहे.

पुलाचे राहिलेले वीस टक्के काम पुढील महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे पावसाळी वातावरणातही रात्रंदिवस काम सुरू आहे. याच दबावाने आणि घिसाडघाईने 20 निरपराध कामगारांचा हकनाक बळी घेतला. त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर पाडल्याचा घणाघात शिवसेनेने राज्य सरकारवर केला आहे.

संभाजी भिडेंना वक्तव्य भोवलं! आठ दिवसांत पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश…

 

Tags

follow us