Vinayak Raut replies Devendra Fadnavis : संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून चांगलाच वाद पेटला आहे. संसदेच्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे असे कारण देत काँग्रेससर 20 पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचाही समावेश आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी कठोर शब्दांत उत्तर दिले.
फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची खूप मस्ती गेली आहे. अजून थोडे महिने राहिले आहेत. नंतर त्यांना त्यांची जागा कळून चुकेल, असा इशारा राऊत यांनी दिला.
तिथं उमेदवारापासूनच मारामारी, आम्हाला नो टेन्शन; मुख्यमंत्री बॅनरवर शिंदेचे पटोलेंना चिमटे
काय म्हणाले फडणवीस?
नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनाला मी जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. याबाबत प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने त्यांना विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले, त्यांना कोण घेऊन जातंय. त्यांना जी जागा दिली होती, तिथेच ते जात नाहीत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत, दोन तासांच्या वर तिथे बसत नाहीत. त्यांना कोण लोकसभेत आणि संसद भवनात बोलवतंय? या सगळ्या लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाही.
दरम्यान, याआधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या मुद्द्यावर फडणवीसांना फटकारले होते. लोकशाहीवादी आणि देशभक्तांना सध्या दिल्लीत बोलावतच नाहीत. जे चमचे असतात चाटूकार असतात, मोदींच्या भजन मंडळात जे सामील झाले आहेत त्यांनाच बोलावलं जातं. जर राष्ट्रपतींनाच बोलावलं नाही तिथं आमचे काय? असा सवाल करत बाकी न बोलवता जाणारे पंक्तीमध्ये बसणारे अनेक लोक असतात ते चालले असतील, असे राऊत म्हणाले होते.
आम्ही विरोधी पक्ष नसून देशभक्त आहोत. या देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत. संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटनाला विरोध नाही. पण राष्ट्रपतींनाही सामावून घेतलं पाहिजे. फक्त एक राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ठरवलं असेल तर ते चुकीचं आहे, असेही त्यांनी सांगितले.