Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तुम्हाला एक महिन्याचा वेळ देतो. सकाळचा 9 वाजताचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या घालू, अशा धमकीचा फोन आल्यानंतर राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घडामोडींवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले, पहिल्या वेळेला मला धमकी आली होती. त्याची माहिती मी गृहमंत्र्यांना दिली होती. तेव्हा त्यांची चेष्टा केली. गृहमंत्री धमकी गांभीर्याने घेत नसेल आणि चेष्टा करत असेल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल त्यांनी केला. हा प्रकार गृहमंत्र्यांना महाग पडल्याशिवाय राहणार नाही. त्यावर आता हे सरकार घालवणे हाच पर्याय आहे. हा सरकार प्रायोजित दहशतवाद आहे, अशा शब्दांत राऊत यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.
मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
आधी या प्रश्नांची उत्तरे द्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धमकी देण्यात आल्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी दखल घेत राजकीय नेत्यांना धमकी देणं खपवून घेणार नाही, असे म्हटल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे. पण, कधी कारवाई करणार? तुमच्या पक्षाचे लोकं ज्यापद्धतीने हातात तलवार आणि बंदूका घेण्याची भाषा करत आहेत त्यावर तुम्ही काय कारवाई केली?, तुमच्या पक्षाचे लोकं अप्रत्यक्षपणे या राज्यात दंगली घडवतात काय कारवाई केली तुम्ही? या मुंबई महाराष्ट्रात महिलांचे संरक्षण करू शकत नाहीत त्यांच्या हत्या होतात काय कारवाई केली तुम्ही? हे आधी सांगा, असे सवाल राऊत यांनी केले.
प्रत्येक प्रकारची तेढ निर्माण करून राजकारण करण्याचा प्रकार केला जात आहे. हा आताच्या गृहमंत्र्यांच्या आधीच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रकार आहे. मी धमकीची कधीही तक्रार करत नाही. फक्त माहिती देण्याचे काम करतो कारण, तक्रार करून काहीच उपयोग होत नाही. हे निर्ढावलेलं लोकं आहेत. या धमक्या नक्कीच सरकारपुरस्कृत आहेत.