“वाट पाहीन पण एसटीने जाईन…” असं म्हणत दररोज लाखो प्रवासी लाल परीने प्रवास करतात. राज्यातील शहरे आणि खेड्यांना जोडणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणात एसटीचे अनन्यसाधारण महत्व आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, पुस्कारप्राप्त अशा अनेक घटकांना असलेली सवलत आणि इतर प्रवाशांनाही खिशाला परवडणारा दर असल्याने एसटीनेच प्रवास करण्याकडे ओढा असतो.
पण आता या संख्येवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एसटीची तब्बल 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय झाला आहे. शनिवारपासून ही भाढेवाढ लागूही केली आहे. या निर्णयामुळे एसटीने नियमित प्रवास करणार्यांवर आर्थिक ताण येणार हे नक्की आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर मोठी टीका केली आहे. पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीला प्रतिदिन तीन कोटी रुपये नुकसान होते, डिझेलचा खर्च, मेन्टेन्सचा खर्च वाढला आहे ही आणि अशी विविध कारणे देत भाडे वाढ अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra State Road Transport Corporation has decided to increase fares by 14.95 percent)
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाची स्थिती काही चांगली नाही. मासिक उत्पन्न आणि खर्च यांचे गणित जुळत नाही, एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. एसटीला दिवसाला तीन कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे भाडे वाढ अपरिहार्य आहे. पण एसटीची ही अशी स्थिती का झाली हे सुरूवातीला पाहू…
सवलतींची वाढलेली संख्या आणि रक्कम हे एसटीची स्थिती तोट्यात जाण्याचे पहिले कारण आहे.
दररोज 55 लाख प्रवासी एसटीचा प्रवास करतात. याद्वारे महामंडळाला प्रतिदिन जवळपास 23 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण यामध्ये सवलतीच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. एसटीमध्ये 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना, 75 वर्षांपर्यंतच्या महिलांना आणि 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ पुरुषांना 50 टक्के सवलत आहे. याशिवाय विद्यार्थी आणि नोकरदारांचे मासिक पास, विविध पुरस्कार्थी, अंध व अंपग व्यक्ती, विविध आजारांनी ग्रासलेले रूग्ण अशा जवळपास तीन डझन सवलती दिल्या जातात.
या सवलतींमुळे प्रवासी वाढल्याचा दावा सरकारकडून केला जातो. जो खराही आहे. पण त्यामुळे वाढलेली सवलतीची रक्कमही लक्षात घ्यायला हवी. 2022-23 मध्ये 22 कोटी 35 लाख सवलतीच्या प्रवासाचे लाभार्थी होते. या सवलतीची रक्कम 1575 कोटी रुपये होती. हीच संख्या 2023-24 मध्ये वाढून 89 कोटी 36 लाख प्रवाशांनी सवलतीचा लाभ घेतला होता. या सवलतीची रक्कम तब्बल चार हजार अकरा कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात एसटीच्या 31 पैकी 20 विभागांनी नफा कमवला होता. पण 11 विभाग तोट्यात होतेच.
दुसरे कारण आहे साडे तीन वर्षांपूर्वी झालेली शेवटची भाडे वाढ :
एसटीची शेवटची भाडेवाढ नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती. मात्र त्यानंतर एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आलेली नव्हती. मध्यंतरी 12.50 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात होता. परंतु, त्याला मान्यता मिळाली नव्हती. अशात कोरोना काळात दोन वर्षे एसटी बंद होती. त्यानंतर संपाच्या काळात सहा महिने चाके थांबली होती. एका बाजूला सवलतीची वाढलेली रक्कम आणि दुसऱ्या बाजूला भाडे वाढ न होणे, इतर खर्चात झालेली वाढ, थांबलेले उत्पन्न यामुळे एसटीची स्थिती दिवसेंदिवस हालाखीची बनली. यामुळेच आता एकत्रित 14.95 टक्के भाडे वाढ केल्याचे बोलले जाते.
एसटीला डिझेलवर कोणतीही सूट मिळत नाही, हे तिसरे प्रमुख कारण आहे :
एसटीला साधारण दररोज 12 लाख लिटर डिझेल लागते. पूर्वी महामंडळाला सवलतीच्या दरात डिझेल पुरवठा केला जात होता. पण काही वर्षांपूर्वी तो बंद करण्यात आला. त्यामुळे प्रती वर्षी साधारण 3400 ते 3500 कोटी रुपये इतकी रक्कम डिझेलवर खर्च होते. मध्यंतरी अर्थसंकल्पात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील मूल्यवर्धित कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के करण्यात आला. पण एसटीच्या बहुतांश गाड्या ग्रामीण भागात डिझेल भरतात. त्यामुळे या घटलेला कराचा एसटीला फायदा झाला नाही.
सरकारकडूनही एसटीला पुरेशी मदत मिळत नाही हे चौथे कारण :
शासनाकडून गत अर्थसंकल्पात एसटीसाठी कोणतीही तरतूद केली नसल्याचा दावा एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला होता. एसटी निधीच्या तरतुदींपासून उपेक्षित राहिली. विकास कामांसाठी आणि नव्या गाड्या घेण्यासाठी अर्थ संकल्पात एका पैशाचीही मदत केली नाही, असे ते म्हणाले होते. शिवाय राज्य शासनाकडून दिला जाणारा सवलतीच्या रकमेचा फरकही नियमित दिला जात नाही.
वाढलेला खर्च हे पाचवे प्रमुख कारण :
एका बाजूला उत्पन्न घटत असतानाच दुसऱ्या बाजूला मागच्या काही वर्षांत महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संपानंतर कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्यात आले. एसटीचे सुटे पार्ट महाग झाल्याने मेंटनन्सचा खर्च अधिक येऊ लागला. त्यामुळे खर्चात वाढ होऊ लागली आहे. एसटीला कुठलीच कर आकारणी नसावी अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र दुर्दैवानं साधारण विविध कराच्या रूपानं वर्षाला 1200 इतकी रक्कम एसटीला भरावी लागते.
नवीन बसेस खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा :
मेन्टेन्सचा आणि डिझेलचा खर्च जास्त येत असल्याने हामंडळाने इलेक्ट्रिक गाड्यांवर भर दिला आहे. या नवीन बसेस खरेदी करण्यासाठीही एसटीला पैसे लागणार आहेत. एसटीकडे आज घडीला 14300 स्वत:च्या बसेस आहेत. त्यावर 87 हजार कर्मचारी काम करत आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, इलेक्ट्रिकच्या पाच हजार बसेसची ऑर्डर दिलेल्या आहेत. साडे चारशे ते पाचशे बसेस एसटीच्या ताफ्यात आलेल्या आहेत, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सांगितले की नवीन बसेस खरेदी करण्यासाठी आम्हाला पैसे लागणार आहेत.
दिवाळीची भाडेवाढ नाही, त्यामुळे शेकडो कोटींचा महसूल बुडाला :
महसूल वाढीच्या दृष्टीने दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात सरसकट 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. गतवर्षी ही तिकीट दरवाढ 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 या एका महिन्याच्या कालावधीसाठी होती. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना खूश करण्यासाठी महायुती सरकारने ही हंगामी भाडेवाढ रद्द केली होती. यामुळे दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा मिळाला. परंतु, दिवाळीमध्ये मिळणारे शेकडो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर एसटी महामंडळाला पाणी सोडावे लागले होते.
एसटी महामंडळाला 21 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान दिवाळी हंगामात एसटीला 218 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. पण एसटीमधून प्रवास करणाऱ्या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, तर 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली. शिवाय 75 वर्षांपर्यंतच्या सरसकट सर्वच महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे 2023 मध्ये दिवाळीत एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती.
एसटीने 2023 मधील दिवाळीत 8 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली होती. तरीही प्रवाशांनी एसटीमधूनच प्रवास करणे पसंत केले होते. एसटीला या कालावधीत 615 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यातही 20 नोव्हेंबर 2023 या एकाच दिवशी तब्बल 37.63 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. एसटीच्या इतिहासातील हे विक्रमी दैनंदिन उत्पन्न ठरले आहे. यंदाही एसटीकडे हे उत्पन्न मिळविण्याची संधी होती. पण शासनाने ही भाडेवाढ रद्द केली होती.
याच सगळ्या कारणांमुळे शासनाने एकत्रित 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आता नवीन दर कसे असणार ते पाहू…
एसटीमधून प्रवास करताना एक टप्पा सहा किलोमीटरचा असतो. आतापर्यंत एका टप्प्यासाठी आठ रुपये 70 पैसेनुसार तिकीट दर होते. आता नवीन निर्णयानुसार प्रतिटप्पा 11 रुपये आकारले जाणार आहेत. जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचेही भाडे सारखेच असेल. निमआरामसाठी 11.85 रुपयांऐवजी 15 रुपये मोजावे लागतील. शिवशाही (एसी) बसचे भाडे 12.35 वरून 16 रुपये झाले आहे. तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) 17 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच शिवनेरीचे (एसी) भाडे 18.50 ऐवजी 23 रुपये झाले आहे. तर शिवनेरी स्लिपरचे भाडे 28 रुपये झाले आहे.
यानुसार आता तुम्हाला तुमच्या रोजच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यासाठी किती तिकीट झाले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.