Rupali Chakankar : राज्यात महिलांच्या फसवणुकीचे रॅकेट कार्यरत आहे. राज्यातून थेट ओमान, दुबई येथे मुली नेल्या जातात. महिला व मुलींची फसवणूक होते. हे एक मोठे रॅकेट राज्यात आहे असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या रॅकेटमधील मध्यस्थांचा शोध घेतला. त्यातील दोघा एजंटांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून या रॅकेटची माहिती घेतली. या रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आणि समाधानाची गोष्ट म्हणजे यातील काही महिलांची आम्ही सुटका करू शकलो, अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी महिलांच्या फसवणुकीच्या रॅकेटवरील कारवाईची माहिती दिली.
लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी चाकणकर यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात चाकणकर यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. राज्यात कशा पद्धतीने महिलांची फसवणूक करून त्यांना थेट दुबई, ओमान या ठिकाणी पाठवले जाते याची धक्कादायक माहिती दिली.
‘त्या’ फोननंतर मिळाले महिला आयोगाचे अध्यक्षपद; चाकणकरांनी सांगितला खास किस्सा
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा महिलांच्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महिला आयोगाने पुढे काय कार्यवाही केली असा प्रश्न चाकणकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना चाकणकर म्हणाल्या, गेल्या दीड वर्षांपासून आम्ही या विषयात लक्ष घालत आहोत. काही दिवसांपूर्वी पुण्यात जनता दरबार आयोजित केला होता. या ठिकाणी मला काही कुटुंबे येऊन भेटली. त्यांनी घरातील महिला सदस्यांची फसवणूक करून त्यांना दुबई, ओमान या ठिकाणी नेण्यात आल्याचे सांगितले.
कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले होते. त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न होता. त्यावेळी एजंटांच्या माध्यमातून व्यवसाय व रोजगाराच्या संधींबाबत जाहिराती दिल्या गेल्या होत्या. नोकरीची संधी आहे. आम्ही तुम्हाला दुबई, ओमानमध्ये नोकरी देऊ . तेथे रोजगार उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीच्या त्या जाहिराती होत्या.
त्यानंतर या एजंटांच्या माध्यमातून महिलांची नोंदणी केली गेली. नंतर त्यांना त्या देशात नेण्यात आले. तिथे गेल्यानंतर विमानतळावरच त्यांचे पासपोर्ट व्हिसा आणि अन्य महत्वाची कागदपत्रे जप्त केली. मोबाइल फोनही काढून घेतले गेले. हा सगळा प्रकार कुटुंबातील सदस्यांनीच सांगितला. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यानंतर आम्ही माहिती काढली तर पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड येथीलच जवळपास 82 महिला त्यात अडकल्याचे समोर आले. राज्यातील अडीच ते पावणे तीन हजार महिला यात अडकल्याचे समोर आले.
Heatwave : राज्यात उकाड्याने नागरिक त्रस्त, वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ
यानंतर आम्ही भारतीय दूतावास, परराष्ट्र विभागाशी संपर्क केला. त्यांना या महिलांची संपूर्ण माहिती दिली. यापैकी जर काही महिला देशातच कुठे असतील तर त्यांचा शोध घेण्याची विनंती केली. त्यांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. सहकार्य केले.
पण, आम्ही ज्या महिलांची माहिती त्यांना दिली त्या महिलांचे लोकेशनची माहिती मिळत नाही, ही मोठी अडचण झाली आहे. कारण, त्या महिलांकडे मोबाइल नाहीत. त्यामुळे त्या आता कुठे आहेत याची माहिती कठीण बनल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यांतही महिलांची अशा प्रकारे फसवणूक होत आहे. परंतु, या महिलांसाठी राज्य महिला आयोग सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्ये आम्ही काही महिलांना शोधले देखील आहे. यामध्ये आम्हाला यश येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दोन एजंटांना बेड्या
परदेशात रोजगाराची संधीचे अमिष दाखवून महिलांची फसवणूक करण्याच्या या प्रकारात गुंतलेल्या दोन एजंटांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. नंतर या एजंटांकडून या रॅकेटची माहिती घेण्यात आली. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. यामध्ये आम्हाला आता अनेक सामाजिक यंत्रणाही मदत करत असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
अजितदादांचे धन्यवाद
महिलांच्या फसवणुकीचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित करत याकडे लक्ष वेधले. त्यामुळे मी अजितदादांना धन्यवाद देते. तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील फोन करून या प्रकरणात मदतीचे आश्वासन दिले. त्यांची देखील यंत्रणा मदत करत आहेत. अनेक सामाजिक संघटनाही या कामात आम्हाला मदत करत असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.