सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) आमदार बाबासाहेब देशमुख यांची भाजप जवळीक कमालीची वाढली आहे. याबाबतचा एक फोटो समोर आला आहे. यानंतर आता देशमुखांचे नातू लाल बावटा सोडून 2029 ला भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. नेमकं सोलापूरच्या राजकारणात कोणत्या फोटोमुळे खळबळ उडाली आहे त्याबद्दल जाणून घेऊया…
नेमकं काय घडलं?
सध्या राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. त्यात गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेकपाचे आमदार बाबासाहेब देशमुख हे स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर होते. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेत बाबासाहेब देशमुखांना आपल्यासोबत आघाडीवर ठेवले होते. विरोधकांच्या आमदाराने थेट भाजप उमेदवाराच्या अर्ज भरणीला उपस्थित राहिल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गणपतरावांचा ‘लाल बावटा’ सोडून नातू 2029 ला भाजपच्या चिन्हावर लढणार?
बाबासाहेब देशमुख हे सांगोल्याचे दिवंगत लोकनेते आणि 11 वेळा आमदार राहिलेले भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. गणपतरावांनी आयुष्यभर शेकापच्या माध्यमातून ‘लाल बावटा’ हाती धरून डाव्या विचारसरणीचे आणि शेतकरी-शेतमजुरांचे राजकारण केले. मात्र, त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख आता गणपतरावांचा हा वैचारिक वारसा बाजूला ठेवून 2029 ची विधानसभा निवडणूक थेट भाजपच्या चिन्हावर लढवणार का? अशी विचारणा सांगोल्यातील जनता समोर आलेल्या फोटोमुळे आता करू लागली आहे.
देशमुखांची भाजपशी जुनीच ‘छुपी जवळीक’
राजकीय विश्लेषकांच्या मते, बाबासाहेब देशमुखांची भाजपासोबतची ही जवळीक अचानक झालेली नसून याचे धागेदोरे खूप जुने आहेत. यापूर्वी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चक्क भाजपच्या चिन्हावर लढला होता. एवढेच नाही तर, 2024 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बाबासाहेब देशमुखांनी तातडीने मुंबईत जाऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते भाजपचे ‘छुपे समर्थक’ आमदार असल्याची चर्चा रंगली होती, ज्यावर राऊत यांच्या उमेदवारीवेळी हजरेहीने शिक्कामोर्तब केलं आहे.
बाबासाहेब देशमुखांचा विजय सोपा नव्हता पण…
2024 च्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब देशमुखांचा विजय सोपा नव्हता. त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली होती. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः देशमुखांच्या उमेदवारीसाठी मोठा पुढाकार घेतला होता आणि सांगोल्यात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, आमदारकीची खुर्ची मिळताच बाबासाहेब देशमुख इतिहास आणि शरद पवारांचे उपकार विसरू पाहत असल्याच्या भावना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत.
उपस्थितीचे राजकीय परिमाण
आजवर शेतकरी कामगार पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला राहिलेल्या सांगोल्यात आता वैचारिक परिवर्तन पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील देशमुखांच्या आजच्या वावरामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर केवळ अधिकृत शिक्कामोर्तब होणेच बाकी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हा सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीसाठी आणि विशेषतः शरद पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
