एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा! अब्दुल सत्तारांचे विधान, महायुती टिकवायची की नाही, हे भाजपच्या हातात

शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका मांडल्याने या चर्चेला आणखी जोर आला आहे.

Untitled Design   2026 10 29T171302.878

Untitled Design 2026 10 29T171302.878

Make Eknath Shinde the Chief Minister again! – Abdul Sattar’s statement : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात आहे. शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका मांडल्याने या चर्चेला आणखी जोर आला आहे. महायुती टिकवायची की नाही, हे आता भाजपच्या हातात आहे, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

विधान परिषद निवडणुकीतील शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले की, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आपण देखील चव्हाण यांना विरोध केला. आपण कोणतीही गोष्ट लपूनछपून केली नसून, आपली भूमिका उघडपणे मांडल्याचे सत्तार यांनी सांगितले.

महायुतीत कोणताही मतभेद निर्माण झालेला नाही, असे देखील त्यांनी म्हटले. काही प्रश्न असतील, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून चर्चा करू शकतात. त्यांच्याकडून विचारणा झाल्यास आपण त्याची उत्तरे देऊ, अशी भूमिका सत्तार यांनी मांडली. एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतात, तेव्हा शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का, अशी चर्चा सुरू होते. अशा चर्चांमुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद होतो, असे सत्तार म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाची मागणी अन् बावनकुळेंचा पलटवार, रवींद्र धंगेकरांना म्हणाले, आपली उंची पाहून बोला

मात्र, या चर्चांमुळे भाजपमधील काही नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याचं देखील त्यांनी सूचित केलं. भाजपचे महाराष्ट्रात 132 आमदार आहेत, तर बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्यकता आहे. ते सांगत सत्तार यांनी महायुतीच्या भविष्याबाबत महत्वपूर्ण विधान केले. महायुती टिकवायची की नाही, हे सर्व भाजपच्या हातात आहे, असे सत्तार यांनी म्हटले. 2024 च्या विधानसभा निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर शिंदे यांचाच अधिकार असल्याची भावना शिवसेनेत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

दुसरीकडे, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील शिंदे यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना सरकार आणि जनतेमधील समन्वय चांगला होता. त्यामुळे राज्याचे नेतृत्व पुन्हा त्यांच्याकडे सोपवावे, अशी मागणी धंगेकर यांनी केली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील समन्वयाचा मुद्दा चर्चेत आला आहे. निवडणुकीतील पराभवासाठी मित्रपक्षांच्या भूमिकेला जबाबदार धरण्याचे प्रयत्न होत असतानाच, शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत व्यक्त होणाऱ्या भूमिकांमुळे वादाला नवे वळण मिळाले आहे.

अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या हातात महायुतीचे भविष्य असल्याचे विधान केले, तर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची मागणी केली. त्यामुळे हा वाद केवळ विधान परिषद निवडणुकीतील निकालापुरता मर्यादित आहे की मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वावरून महायुतीत मोठी चर्चा सुरू आहे, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version