जरांगे पाटलांची प्रकृती बिघडल्याने मराठा समाज आक्रमक; सोलापुरात पालकमंत्र्यांचा ताफा अडवला

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे जयकुमार गोरे यांच्या ताफ्यासमोर काही मराठा आंदोलक अचानक आले.

News Photo   2026 09 01T194420.744

जरांगेंच्या प्रकृतीने मराठा समाज आक्रमक; सोलापुरात मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Patil) यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक आंदोलन केलं. धाराशिवमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या उंच इमारतीवर चढून आंदोलकांनी आंदोलन केलं, तर सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न झाला.

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे जयकुमार गोरे यांच्या ताफ्यासमोर काही मराठा आंदोलक अचानक आले. यावेळी काही आंदोलकांनी गाडीसमोर आडवं झोपत गाडीखाली जाण्याचा प्रयत्न केला. ‘एक मराठा लाख मराठा’ तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोरे यांच्यासोबत माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही वाहनात होते. माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला.

माजी आमदार शहाजी बापू जरांगेंच्या भेटीला; थेट मंत्री शंभूराज देसाईंना फोन लावत म्हणाले

ताफा अडवण्याच्या प्रकारानंतर जयकुमार गोरे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांशी चर्चा केली. बबन शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर व्यासपीठावर बसलेले असताना त्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी याबाबत चर्चा केली. दरम्यान, पोलिसांनी गाडीसमोर आलेल्या आंदोलकांना बाजूला केल्यानंतर गोरे यांचा ताफा पुढे रवाना झाला. या घटनेनंतर सोलापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाही अधिक सतर्क झाली आहे.

दरम्यान, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे यांची खालावलेली प्रकृती पाहून शहाजी बापू भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यानंतर त्यांनी थेट मंत्री शंभुराजे देसाई यांना फोन करून जरांगे यांची प्रकृती पाहवत नसल्याचं सांगितलं. ‘आमच्या पोरांनी जगायचं कसं’, असा सवाल करत देशभरातील मराठा समाजाचं लक्ष अंतरवाली सराटीकडे लागलं असल्याचं शहाजी बापू यांनी म्हटलं.

Exit mobile version