Marathi Language Dispute : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठी भाषेवरुन राजकारण तापलं आहे. आज मुंबईतील दहिसर परिसरात याच मुद्द्यावरुन मनसे आणि शिंदे शिवसेनेदरम्यान जोरदार राडा पाहायला मिळाला. दहिसर परिसरातील गणपत पाटील नगर येथे शिंदे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम रिक्षाचालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते मात्र यावेळी निरुपम यांना मनसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
मनसैनिकांनी निरुपम (Sanjay Nirupam) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. याचबरोबर मनसैनिकांनी त्यांच्या गाडीच्या चाकातील हवा देखील काढली. तर दुसरीकडे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून मनसैनिकांवर (MNS) लाठीचार्ज देखील करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय ?
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम दहिसरमधील (Dahisar) गणपत पाटील नगर परिसरात रिक्षाचालकांशी भेटायला गेले होते. मात्र यावेळी परप्रांतीय रिक्षाचालकांची भेट घेण्यासाठी आलेल्या संजय निरुपम यांच्याविरोधात मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच त्यांच्या गाडीची हवा देखील मनसैनिकांकडून सोडण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
1 मेपासून रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी राज्यात मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांनी घेतलेल्या या निर्णयाला संजय निरुपम यांनी आक्षेप घेत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.
‘आप’ ला मोठा धक्का! राघव चढ्ढा यांच्यासह तीन राज्यसभा खासदार करणार भाजपात प्रवेश –
तर दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाला मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे आज परप्रांतीय रिक्षाचालकांची भेट घेतल्याने माजी खासदार संजय निरुपम यांच्याविरोधात मनसेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
