Ajanta Werul International Film Festival : सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुणे मुंबईतच घडू शकतात असे नाही, हे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दाखवून दिले आहे. विशेषत: मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर करण्याचे काम या महोत्सवाने केले असे प्रतिपादन पद्मभूषण सई परांजपे यांनी केले. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी परांजपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, नंदकिशोर कागलीवाल, लतिका पाडगांवकर, अभिनेत्री सीमा बिस्वास, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, सुनील सुकथनकर, चंद्रकांत कुलकर्णी, नीलेश राऊत आदी उपस्थित होते.
सई परांजपे म्हणाल्या, गेल्या वीस वर्षांमध्ये मराठी सिनेमाला उभारी आली असून आज वर्षाला किमान ५०-६० मराठी चित्रपट तयार होतात. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवामधून यातल्या बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातले काहीतरी तांत्रिक दृष्ट्या थोडे कच्चे असले तरी आशयाला पक्के असल्यामुळे हे सिनेमे थेट भिडतात, असे परांजपे म्हणाल्या.
अनुष्का शेट्टीच्या ‘घाटी’ चित्रपटात विक्रम प्रभूची एंट्री, दिसणार देसी राजूच्या भूमिकेत
अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे ही आनंदाची बाब आहे. अशा महोत्सवात सेलिब्रेटी, क्रिएटिव्हिटी आणि कॉमर्स हे तीन सी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. चित्रपट बनविणाऱ्या मंडळींना महाराष्ट्र शासन कायम सहकार्य करीत आले असून अनेक प्रोत्साहानपर योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षी मराठी सिनेमाला महाराष्ट्र शासनाच्यावतीने १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.
उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तामिळ भाषेतील फिल्म ‘लिटील जाफना’ ही फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित करण्यात आली.
भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिद्ध मूकपट कालिया मर्दन याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी करण्यात आले. शंभर वर्षांपूर्वीचा मूकपट प्रत्यक्ष संगीताद्वारे रसिकांना अनुभवता यावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील सतब्दीर सब्द या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला गेला. या समूहामध्ये सात्यकी बॅनर्जी, सुचल चक्रवर्ती, तीर्थंकर बॅनर्जी, सुमंत्र गुहा, सौमाल्य सरेश्वरी, अरुणभा गुप्ता, दिव्यकमल मित्र आणि स्वरूप मुखर्जी या कलाकारांचा समावेश होता.
व्हर्सेटाइल अभिनेत्री ते पॅराग्लायडिंग पायलट! सईची बातच न्यारी…
या महोत्सवात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटाची माहिती असणाऱ्या कॅटलॉगचे अनावरण यावेळी करण्यात आले. एमजीएम पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महोत्सवासंदर्भात तयार केलेल्या बुलेटिनचेही यावेळी विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे आणि प्रियंका शाह यांनी केले, तर आभार प्रा. शिव कदम यांनी मानले.