Download App

आदित्य ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न अन् दगडफेक, औरंगाबादेत घडला प्रकार

औरंगाबाद : औरंगाबादेतील महालगावमध्ये रमाई जयंतीनिमित्त मिरवणूक सुरु असतानाच शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तेथून जात होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा अन् दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय.

सध्या आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु असून ते आज औरंगाबाद जिल्ह्यात होते. याचवेळी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघात रमाई आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरु होती. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरेंची सभा होती त्या ठिकाणाहून जयंतीची मिरवणूक पूर्व नियोजित होती.

मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाल्याची माहिती समोर आलीय.

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सध्या नाशिकमधून औरंगबादमध्ये दाखल झालीय. वैजापूर तालुक्यातील महालगाव इथं आज आदित्य ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभा सुरु असतानाच मिरवणूक सुरु होती. त्यामुळे हा वाद झाला आहे.

वाद झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला असून त्यानंतर ठाकरेंच्या गाडीवरही दगडफेक झाल्याची माहिती समोर आलीय. यावेळी मिरवणुकीतील काही कार्यकार्ये संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेत भाषण उरकले. मात्र, सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे गाडीत बसून जात असताना मिरवणुकीतील संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आदित्य ठाकरे यांना गावाच्या बाहेर काढण्यात आले. आदित्य ठाकरे गेल्यानंतरही त्या ठिकाणी बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता.

Tags

follow us