Download App

करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंना दणदणीत झटका… नक्की मॅटर काय आहे?

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मागे लागलेली साडेसाती दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक झाल्याने त्यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. त्यातही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्जात माहिती लपवल्याचा दावा करत विरोधी उमेदवार राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली आहे. अशात आता मुंडे यांच्यामागे नवीन प्रकरण लागले आहे. वांद्रे येथील कौंटुबिक न्यायालयाने मुंडे यांना सकृतदर्शनी कौटुंबिक हिंसाचारात दोषी ठरवलं आहे.

करूणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत, दोघांचे कौटुंबिक संबंध होते. आता करूणा मुंडे यांना संरक्षण देण्याचे आणि दोन लाख रुपयांचे पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. माध्यमांमध्ये या बातम्या येताच एकच गदारोळ झाला. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी एक पत्र काढून माध्यमांना झाप झाप झापलं. सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. करुणा शर्मा आणि त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून दोन लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय दिला आहे.

तसंच धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नाही. याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे, असे सावंत यांनी सांगितले. आता न्यायालय म्हणते की सकृतदर्शनी प्रतिवाद्यांकडून कौटुंबिक हिंसाचार झाला. अर्जदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला. तसंच प्रतिवाद्याने अर्जदाराला म्हणजे करूणा शर्मा मुंडे यांना प्रतिवाद्याने म्हणजे धनंजय मुंडे यांनी महिन्याला दोन लाख रुपये पोटगी म्हणून द्यावेत. त्याचवेळी धनंजय मुंडे यांचे वकील मात्र असं काहीच झालेलं नसल्याचं सांगत आहेत.

त्यामुळेच नक्की काय मॅटर आहे? आणि न्यायालयाने काय म्हंटलं आहे? पाहुया…

सुरुवातीला करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काय आरोप लावले आहेत? हे जाणून घेऊ. करूणा शर्म यांच्या मते 9 जानेवारी 1998 रोजी धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. त्यांचा हा प्रेमविवाह आणि अंतरजातीय विवाह होता. त्यांच्यापासून त्यांना सिशिव आणि शिवानी अशी दोन मुले आहेत. लग्नानंतर काही वर्ष आपण आणि धनंजय मुंडे हे इंदौरमध्ये वास्तव्याला होतो. त्यानंतर मुंबईमध्ये वास्तव्याला आलो. 2018 पर्यंत आमच्या दोघांमधील संबंध सुरळीत होते. पण 2018 नंतर धनंजय मुंडे यांच्या वागण्यात अचानक बदल झाला. ते आमच्याकडे दुर्लक्ष करू लागले.

धनंजय मुंडे हे आमदार आहेत, त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी होती. त्यामुळे ते नेहमीच मुंबईच्या बाहेर असायचे. त्यानंतर त्यांनी राजश्री यांच्या सोबतलग्न केले. या लग्नाबद्दल विचारले असता, सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि कुटुंबाचा आग्रह ठेवण्यासाठी राजश्री मुंडे यांच्यासोबत दुसरे लग्न केले. पण त्यांनी आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा देण्याबाबत आश्वस्त केले होते. धनंजय मुंडे यांची सामाजिक प्रतिष्ठा लक्षात घेता आपण या लग्नाबाबत तक्रार केली नाही. आपण धनंजय मुंडे यांना त्यांच्यासोबत त्यांच्या मूळ गावी राहण्यासाठी आग्रह केला. पण हा विवाह कुटुंबाला मान्य होणार नाही. गावी राहिल्यास आपले राजकीय क्षेत्रातील करिअर उद्ध्वस्त होईल.

त्यामुळे गावी राहू नये यासाठी धमकावले गेले. त्यानंतर मी बहिणीसोबत राहू लागले. त्यानंतर बहिणीला शारीरिक त्रास दिला गेला. मला आणि माझ्या आईला कार्यकर्त्यांकडून मारण्याची व्यवस्था केली गेली. नोव्हेंबर 2020 मध्ये मी मूळ गावी गेले असता मला धमकावण्यात आले आणि गावी न येण्याबाबत बजावण्यात आले. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शारीरिक त्रास देण्यात आला. धनंजय मुंडे यांनी आपाला शारीरिक आणि मानसिक छळ केला. आपले पत्नी म्हणून आपल्याला असलेले सर्व अधिकार आणि हक्क नाकारण्यात आले. त्यामुळेच कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत त्यांच्याविरोधात दावा करत आहे, असे करूणा मुंडे यांनी न्यायालयात सांगितले.

धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरत आला…; कोर्टाच्या निकालावरून तृप्ती देसाईंचा निशाणा

आता दोन्ही बाजूंची प्रतिज्ञापत्रे आणि दोन्ही वकिलांचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने प्रथमदर्शनी किंवा सकृतदर्शनी एक आदेश दिला आहे. हा आदेश समजून घेण्यासाठी लेट्सअप मराठीने अॅड. अभय आपटे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, एखादा खटला जेव्हा पूर्णत्वाकडे येतो तेव्हा दोन भागांमध्ये विभागला जातो. सगळ्यात पहिला भाग असतो तो अंतरिम म्हणजे ताबडतोब आणि तात्पुरता दिलासा काय द्यायला हवा. आता हा दिलासा देताना सकृतदर्शनी यामध्ये कौटुंबिक हिंसाचार आहे का? हा मुद्दा न्यायालयाला निकाली काढावा लागतो.

तर या खटल्यात प्रथमदर्शनी किंवा सकृतदर्शनी न्यायालयाने अर्जदारासोबत म्हणजे करूणा मुंडे यांच्यासोबत कौटुंबिक हिंसाचार झाला हे अंशत: मान्य केले आहे. याचे कारण करूणा शर्मा यांच्या मते त्यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झालेले आहे. पण धनंजय मुंडे हे लग्न नाकारत आहेत. पत्नी म्हणून असलेले अधिकार आणि हक्क नाकारले आहेत. हा एक प्रकारे भावनिक आणि मानसिक हिंसाचार आहे. शिवाय करूणा शर्मा यांना संरक्षणही दिले आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात येते. त्या जेव्हा गावी गेल्या होत्या तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांना दगड मारण्यात आले हा जो प्रकार घडला, त्या प्रकारानंतर संरक्षण दिण्याचे आदेश आहेत. सोबत धनंजय मुंडे यांनी कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असेही बजावले आहे.

तिसरा आदेश आहे तो पोटगीचा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोघांनाही कमाईचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. ते दोघांनी सादर केले. यात करूणा शर्मा यांचे उत्पन्न आहे पण ते धनंजय मुंडे यांच्या एवढे नाही. पण त्यांची जी जीवनशैली आहे त्यानुसार राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी करूणा मुंडे यांना मासिक 1 लाख 25 हजार आणि मुलीला लग्न होईपर्यंत 75 हजार रुपये पोटगी द्यावी असे आदेश दिले आहेत. इथेपर्यंत झाली न्यायालयाची आजची ऑर्डर.

आता दुसरा भाग म्हणजे अॅड. सायली सावंत यांनी दिलेले पत्र. या पत्रात त्यांनी म्हंटलं आहे की माझ्या अशि‍लाविषयी न्यायालयाने कोणताही निवाडा दिलेला नाही. पण हा दावाच चुकीचा असल्याचे अॅड. आपटे म्हणाले. हा आदेश सकृत दर्शनी आहे, म्हणजे आता काय वाटतं यावर आधारित आहे. पुढे हा आदेश बदलूही शकतो. पण आता न्यायालयाला काय वाटतं याबाबतचा हा आदेश आहे. हा आदेश दिला नसता तर न्यायालयाला पुढचा आदेशच देता आला नसता. त्यामुळे तसा निवाडा त्यांनी दिलेला आहे.

पुढे अॅड. सावंत यांनी केवळ पोटगीचा आदेश दिल्याचे म्हंटले आहे. पण न्यायालयाने अर्जदाराला म्हणजे करूणा मुंडे यांना संरक्षणही दिले आहे. यापूर्वीच्या घटनांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची खात्री न्यायालयाला पटली म्हणूनच संरक्षणाचा आदेश दिला आहे. मात्र हेही खरंच आहे हा सकृतदर्शनी दिलेला निकाल आहे. आता न्यायालयात दोन्ही बाजूंचे साक्षी पुरावे होतील. जवळच्या लोकांचे, शेजारच्या लोकांच्या, संबंधित नातेवाईकांच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर साक्षी होतील. त्यानंतर अंतिम निकाल दिला जाईल, असेही आपटे म्हणाले.

माझी आई वडिलांचा बदला घेतेय, तिला आर्थिक विवंचना नाहीत; करुणा शर्मांच्या मुलाचाच मोठा दावा

थोडक्यात धनंजय मुंडे पूर्णपणे दोषी असल्याचा निकाल न्यायालयाने अजून दिलेला नाही. पण न्यायालयाने अजून दोषी ठरवलेच नाही हा बचाव योग्य नाही, हेही तितकेच खरे आहे. न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचाराबद्दल करुणा मुंडे यांचे पुरावे अंशत: योग्य असे स्पष्ट म्हटले आहे. त्यांची केस विचारार्थ वाटली म्हणून अंतिम निकाल येईपर्यंत त्यांना कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत कुठलाही त्रास देऊ नये असे स्पष्ट बजावले आहे. शिवाय केस दाखल केल्यापासून म्हणजे 2020 सालापासून सुरुवात करून प्रति महिना दोन लाख रुपये पोटगी द्यायला सांगितले आहे.

follow us