बीडमध्ये मध्यरात्री खळबळ! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर अज्ञात टोळक्याचा हल्ला, 4 महिला गंभीर…

सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.

Attack On Khokya Satish Bhosale Family

Attack On Khokya Satish Bhosale Family

Attack On Khokya Satish Bhosale Family : बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका भीषण आणि संतापजनक घटनेने परिसर हादरला आहे. स्थानिक गुन्हेगारी विश्वातील ओळख असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात कुटुंबातील चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

थेट महिलांवर वार

ही घटना (Beed Crime) शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्ती येथे गुरुवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सुमारे 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक भोसले (Satish Bhosale) कुटुंबाच्या घरात घुसून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात दांडगे, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. त्यांनी थेट महिलांवर वार करत निर्दयपणे मारहाण (Crime News) केली.

मध्यरात्री भीषण हल्ला

महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक दिली, पण कोणीच पुढे आले नाही. टोळक्याने त्यांच्या डोक्यावर, पाठीत आणि पायांवर गंभीर वार केले, त्यामुळे सर्व महिला रक्तबंबाळ अवस्थेत कोसळल्या. जखमी महिलांनी कसाबसा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की, चार महिलांची प्रकृती गंभीर असून एकीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याचं कारण जागेच्या वादाशी संबंधित असू शकतं. टोळक्याने ‘इथून निघून जा, अनेक वेळा सांगितलंय’ असं म्हणत सतीश भोसलेच्या कुटुंबावर हल्ला केला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सतीश उर्फ खोक्या भोसले कोण?

सतीश भोसले, ज्याला स्थानिक पातळीवर ‘खोक्या भाई’ म्हणून ओळखलं जातं, हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी गावचा रहिवासी आहे. मागील काही वर्षांत तो राजकारणात सक्रिय झाला होता. विशेष म्हणजे, तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय मानला जातो. मात्र, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. काही महिन्यांपूर्वी सतीश भोसलेचे समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले व्हिडिओ मोठ्या चर्चेचा विषय ठरले होते. त्या व्हिडिओंमधून त्याने निर्माण केलेल्या दहशतीबद्दल बीडसह राज्यभर चर्चा झाली होती. वनविभागाच्या कारवाईदरम्यान त्याच्या घरातून काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या, त्यानंतरही त्याचं नाव वादात आलं होतं.

अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणावर बॅटने केलेल्या बेदम मारहाणीच्या प्रकरणात सतीश भोसलेला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तो काही काळ शांत होता. मात्र, आता त्याच्या कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा भोसले कुटुंब चर्चेत आलं आहे.

पोलिसांचा तपास सुरू

शिरूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. हल्ल्याचा नेमका उद्देश आणि टोळक्याची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचा तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील काही संशयित टोळ्यांवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने बीड जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की, जामीनावर बाहेर आलेल्या आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर असा निर्दयी हल्ला का झाला? पोलिसांचा तपास पुढील काही तासांत कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version