Anjali Damania on Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या घटनेला 19 दिवस उलटून गेले तरी आरोपी मोकाटच आहेत. याच घटनेच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा निघणार आहे. मात्र या मोर्चाआधीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अतिशय खळबळजनक दावा केला आहे. शुक्रवारी रात्री त्यांना एक फोन आल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. त्या फोनवर सदरील व्यक्तीने उर्वरित तिन्ही आरोपींचा खून झाल्याचं सांगितले. त्या आरोपींचे मृतदेह कुठे आहेत हे देखील त्या अनोळखी व्यक्तीने सांगितलं असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. तरी देखील मारेकऱ्यांना गजाआड करता आलेलं नाही. विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देत या प्रकरणाची न्यायायलयीन आणि एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल असे सांगितले होते.
पोलीस तपास सुरू असतानाच आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. दमानिया म्हणाल्या रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान मला एक फोन आला. एका अनोळखी इसमाने आधी मला व्हॉट्सअप कॉल केले होते. परंतु, ते कॉल कनेक्ट झाले नाहीत. मग त्याने मला व्हॉईस मेसेज टाकले. त्यात त्यांनी तिन्ही आरोपींचा मर्डर झाल्याचं सांगतिलं. आता हे आरोपी पोलिसांना सापडणारच नाहीत. या घटनेची माहिती मी पोलिसांना दिली आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.