Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत. परंतु, त्यांचा शोध अजून तरी लागलेला नाही. याच दरम्यान धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी या प्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार चौकशीला सुरुवात झाली असली तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरारच आहेत.
मोठी घडामोड! वाल्मीक कराडच्या पत्नीची CID चौकशी; नेमकं कारण काय?
दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातही मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी आणखी आक्रमक पावले उचलत आरोपींची बँक खाती गोठविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. आरोपींची आर्थिक कोंडी करण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात येत आहे.
दरम्यान, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या प्रकरणी धनंजय मु्ंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मीक कराड यांच्या अटकेची मागणी होत आहे. मात्र कराड सध्या फरार आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी होत आहे. यासाठी आता थेट न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. मयत संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख यांनी हा मागणी न्यायालयाकडे केली आहे.
तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची आणि वाल्मीक कराडला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी याचिकेत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे.
Beed Crime : ज्यांना शस्त्रांची गरज नाही, त्यांचे परवाने रद्द करणार, बीडच्या एसपींची माहिती