Beed News : राज्याचं राजकारण अन् समाजकारण एकाच घटनेनं हादरून गेलं आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजत आहे. एकूणच बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण रसातळाला गेल्याची भावना नागरिकांत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर बीड जिल्ह्याचं पालकत्व कुणी घ्यावं हाही प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीत अद्याप पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांनीच बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी केली होती. यानंतर आता बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती; पुण्यात CID समोर हजर पहा व्हिडिओ
संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यात गाजत आहे. ज्या निघृण पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चातील या नागरिकांच्या प्रतिक्रियाही अत्यंत संतप्त होत्या. वाल्मीक कराडला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी या मोर्चात करण्यात आली होती. यानंतर दबाव वाढत चालला होता. या घडामोडींनंतर आज वाल्मीक कराड सीआयडीला कार्यालयात दाखल झाला.
या व्यतिरिक्त आणखीही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडल्याने येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वीकारावं अशी मागणी केली होती. यानंतर आता बीडच्या पालकमंत्रिपदावरून महायुती आणि भाजपात मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बरोबर चर्चा करून मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. बीडमध्ये मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटना पाहता जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अनुभवी आणि वरिष्ठ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा अजून कायम असला तरी बीडबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
केवळ राजकीय द्वेषापोटी माझ्यावर आरोप; शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडची पहिली प्रतिक्रिया समोर
बीड जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं अशी मागणी होत आहे. पण महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे नाव मागे पडले आहे.