Beed Crime : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. याच प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडवरही आरोप होत आहेत. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
बीडच्या जिल्हा प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे. बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाना रद्द करण्यासंदर्भात 100 जणांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. परवाना निलंबित झाल्यानंतर शस्त्र सापडले तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. (MCOCA) याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे अशा ७ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडवर मात्र मोक्का लावण्यात आलेला नाही. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याने त्याच्यावर मोक्का लावलेला नाही असे आता सांगण्यात येत आहे.
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक; बीडमध्ये आणखी एक सरपंचाचा मृत्यू
यानंतर आता जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका शस्त्र परवाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वाल्मिक कराडचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे. त्यामुळे अद्याप ही नोटीस त्याला मिळालेली नाही. कोठडीतून बाहेर आल्यानंतर नोटीस त्याला दिली जाईल असे सांगण्यात आले.