Download App

बंडखोर उमेदवार प्रदीप सोळुंकेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी…

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी अर्ज माघारी न घेतल्याने पक्षाकडून त्यांच्यावर पक्षाने कारवाई केलीय. प्रदीप सोळुंके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. यासंदर्भात पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी पत्रक काढले आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सोळुंके यांना अर्ज माघारी घेण्याबाबत पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. अर्ज मागे न घेणं सोळुंके यांना चागंलच महागात पडलं आहे. पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.

राज्यातील नागपूर आणि नाशिक पदवीधर मतदासंघात नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आता मराठवाड्यातही नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालंय. औरंगाबाद मतदारसंघातून भाजपचे किरण पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांच्याविरोधात निवडणूक लढत असतानाच आता सोळुंके यांनी अर्ज माघारी न घेतल्याने त्यांच्यासमोर निवडणुकीत विजयी होण्यासाठी एक मोठं आव्हान उभं राहिलंय.

विक्रम काळेंना उमेदवारी देतेवेळी सोळुंके यांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता. आपल्याला तिकीट मिळणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला होता. किती दिवस त्यांच्याच नेत्यांना मोठं करायचं, आता भाकरी फिरवली पाहिजे, त्यामुळे मला उमेदवारी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती.

जर मला उमेदवारी दिली नाही तर दुसरं कोणालाही उमेदवारी द्या, पण काळेंना देऊ नका, अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती. मात्र, निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नसल्याचं बोललं जातयं.

आता निवडणुकीत विक्रम काळे यांच्यासमोर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यासह प्रदिप सोळुंके उभे असल्याने त्यांना फटका बसणार असल्याचंही बोललं जातंय. आता त्यांना फटका बसणार की नाही याबाबत अद्याप अस्पष्टताच आहे.

Tags

follow us