Forest guard recruitment Scam : दोन दिवसांपूर्वी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर वन विभागाच्या वन संरक्षक (Conservator of Forests) पदाची परीक्षा घेण्यात आली. मात्र, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या पेपरफुटी घोटाळ्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला करत एकाला अटक केली आहे. दरम्यान, या नव्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे. (Forest guard recruitment paper leaked in Sambhajinagar)
वनविभागात विविध संवर्गासाठी 2 हजार 417 पदांसाठी भरती सुरू आहे. यामध्ये 2 हजार 138 वन संरक्षक पदे आहेत. ही परीक्षा 31 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा TCS द्वारे घेतली जात आहे. 31 जुलै रोजी परीक्षेच्या पहिल्या दिवशी संभाजीनगर येथे वनरक्षक भरतीचा पेपर फुटला. मोबाईलवरून उमेदवारांना उत्तरे सांगणाऱ्या किटचा एमआयडीसी सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या हद्दीबाहेरील बजरंगनगर येथील शिवराणा करिअर अॅकॅडमीवर पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अकादमीचा चालक व त्याचे अन्य साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. प्रत्येक उमेदवाराकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना मोबाईलवरून उत्तरे दिली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. उत्तरं सांगणाऱ्या चौघांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विनोद प्रतापसिंग डोभाल याला अटक केली आहे, तर सचिन गोमालाडू आणि लोधवाल यांच्यासह अन्य साथीदार फरार आहेत.
Nitin Desai Death : असेच म्हणाला होता तुम्ही…; देसाईंच्या एक्झिटमुळे बावनकुळे हळहळले
सचिन गोमलाडू हा हे रॅकेट चालवतो. शिवराणा करिअर अकादमीचे तो संचालक आहेत. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून तो प्रत्येकी 10 लाख रुपये घेणार होता आणि त्याच्या सहकाऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार होता, असे तपासात समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील कलश हॉटेल, शिवराणा करिअर अॅकॅडमी येथे काही लोक बसून वनरक्षक भरती परीक्षेच्या उमेदवारांना मोबाईल फोनवर उत्तरे देत असल्याची माहिती एमआयडीसी सिडकोला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मूळ वनरक्षक भरती परीक्षेचा पेपर नागपूरमधूनच फुटल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. ही प्रश्नपत्रिका स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी नगर येथील टोळीकडे आली. त्यांनी हायटेक कॉपीच्या माध्यमातून परीक्षार्थींना उत्तरे सांगितली. आता नागपुरातून पेपर फुटल्यानंतर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार उघडकीस आणला. मात्र, राज्यातील विविध शहराक आणि जिल्ह्यांत अशाच पद्धतीचे नेटवर्क असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता छत्रपती संभाजीनगर पोलीस याचा तपास करत असल्याने वनरक्षक भरतीचा मोठा घोटाळा समोर येईल, अशी चिन्हे आहेत.