आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक (Election) पार पडत असून 63 जागांसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच गणित जरी जुळलं असलं तरी महायुती मधील घटकपक्ष बहुतांश ठिकाणी मैत्रीपूर्ण लढणार आहेत. जिल्ह्यात यंदा पुन्हा नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. ज्यात शिवसेनेचे नेते खा संदीपान भुमरे, भाजपा आ अनुराधा चव्हाण, आ अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. एकीकडे भाजपा आणि शिवसेनेचे नेते प्रचारात सहभागी झाले असताना दुसरीकडे शिवसेना उबाठा आणि काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी मात्र प्रचार स्थानिक नेत्यांवर सोपवला असल्याचं पाहायला मिळालं.
जिल्हा परिषद महत्त्वाच्या लढती
1) फुलंब्री तालुक्यातील गणोरी जिल्हा परिषद गट मधून निखिल कल्याणराव चव्हाण हे आमदार अनुराधा चव्हाण यांचे सख्खे पुतणे आहेत. याच गटातून आमदार अनुराधा चव्हाण या दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. मात्र यावेळी राजकीय परिस्थिती बदलली असून कल्याण काळे हे काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी यावेळी लढत ही रंगतदार असणार आहे.
2) पाचोड गटात शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचा पुतण्या शिवराज भुमरे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी (दोन्ही गट) विलास शेळके आणि भाजपा पुरस्कृत गोरख राठोड यांचं आव्हान आहे.
3) ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या पत्नी पूनमबाई उदयसिंग राजपूत यांना कन्नडच्या नागद गटातून उमेदवारी दिलीय. मात्र शिवसेनेकडून उदयसिंग राजपूत यांच्या पत्नीला आव्हान देण्यासाठी चंद्रकला राठोड यांना मैदानात उतरवलं आहे. विशेष म्हणजे स्थानिक आमदार संजना जाधव शिंदे शिवसेनेच्या असल्यामुळे उदयसिंग राजपूत यांना ही लढाई कठीण जाणार असल्याचं बोललं जात आहे.
4) सिल्लोड येथील अंभई गट येथे शिवसेना आ अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचा मुलगा अब्दुल अमेर निवडणूक लढणार आहे. त्याचा सामना भाजपाचे त्र्यंबक मारोती गव्हाणे यांच्याबरोबर असणार आहे.
5) ढोरकिन गट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनीता वाकचौरे विरुद्ध राधिका जगताप यांच्यात लढत होणार आहे. सुनिता वाकचौरे या माजी आमदार संजय पाटील वाकचौरे यांच्या पत्नी आहेत, त्यांना काँग्रेसकडून तगडं आव्हान देण्यात आलं आहे.
18 लाख मतदार बजावणार हक्क
पाच हजार चोवीस मतदान यंत्रं, दोन हजार पाचशे बारा कंट्रोल युनिट लागणार आहे. ही यंत्रं नांदेड हून मागविली जाणार आहेत. त्यात तीन हजार अठ्ठेचाळीस कंट्रोल युनिट, पाच हजार पाचसे ब्यान्नव मतदान यंत्रं येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्ह्यात जाणाऱ्या मतदान प्रक्रियेत दोन हजार दोनशे ब्याऐंशी मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी दहा हजार अठ्ठेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून बारा हजार मनुष्यबळाची उपलब्धता आहे अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली.
या मनुष्यबळाची सेवा उपलब्ध करुन घेणे, त्यांचे प्रशिक्षण घेणे, विविध समित्यांचे गठन करणे अशा विविध प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात नऊ निवडणूक निर्णय अधिकारी आणि नऊ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी असतील. या सर्व प्रक्रियेवर जिल्हास्तरीय कार्यालयातून नियंत्रण ठेवलं जाईल, असंही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं.
