Mahadev Jankar : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर ठाम आहेत. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगेंच्या विरोधात उतरले आहेत. आजही बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी सभेला संबोधित करतांना महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाषण थांबवून छगन भुजबळांचे आशीर्वाद घेतले.
सोलापूर लोकसभा : वर्तुळ पूर्ण करण्यासाठी प्रणिती शिंदे सज्ज, भाजपची शोधमोहिम पुन्हा सुरु!
बीड शहरात आज ओबीसींची एल्गार महासभा पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर आदी दिग्गज नेते सभेला उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना महादेव जानकर हे भाषण करण्यासाठी उभे होते. यावेळी भाषण थांबवत त्यांनी व्यासपीठावरील छगन भुजबळ यांचे पाय धरले. यावेळी बोलतांना जानकर म्हणाले की, गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत. गोपीनाथ मुंडेंनी मला मानसपुत्र मानलं होतं. मुंडे साहेब आज हयात नाहीत. पण, छगन भुजबळ जिवंत आहेत. भुजबळ साहेब तुम्हाला मुंडेची जागा भरून काढायची आहे. नो कॉंग्रेस, नो बीजपी, आम्ही तुमच्याकडे वडीलधारे म्हणून पाहतो. वी आर नॉट डिमांडर, वी आर कमांडर…. आज मी तुमचे पाय धरणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी आम्ही जीवाचं पाणी करू, असं म्हणत ते भुजबळांच्या चरणी नतमस्तक झाले.
यावेळी बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक केले. आजची सभा ही निर्णायक सभा आहे. ही गोपीनाथ मुंडे यांची भूमी आहे. धनगर आणि वंजारी ही रथाची दोन चाके आहेत. तर छगन भुजबळ हे सारथ्य करणारे श्रीकृष्ण आहेत. बीडमध्ये ओबीसींची घरं जाळण्यात आली. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढणार आहोत, असं पडळकर म्हणाले.
भुजबळ काय म्हणाले?
यावेळी छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधातील भूमिकेचा पुनरुच्चार केला. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. मराठा समाजाला विरोध नाही, पण आमचं आरक्षण घेणार असला तर आम्ही त्याच्याविरोधातच जाणार असं भुजबळ म्हणाले. तीन कोटी मराठा समाजाला मुंबईत घेऊन जाणार असं ते सांगतात. तुम्ही फिर फिरणार आणि हॉस्पीटलमध्ये झोपणार. दोन, चार मिटींगा घेणार, अजित पवारांनी कायदा पाळा एवढचं म्हटलं तर त्यांच्यावर घाणेरड्या शब्दात टीका केली. एवढी मस्ती कुठून आली तुला, असं शब्दात भुजबळांनी जरांगेवर टीका केली.