Maharashtra Politics : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या राजकारणात मोठे बदल होऊ लागले आहेत. महायुती सरकारचं कामकाज सुरू झालं असलं तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर नाराजी आहे. आता पालकमंत्रिपदावरुनही रस्सीखेंच होत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला गळती लागली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जुन्या आणि कडवट शिवसैनिकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. आता अशीच एक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून पुढे आली आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोहरादेवी महंतांचा जय महाराष्ट्र; नाराजीही उघड
निवडणुकीच्या निकालापासूनच संभाजीनगर शिवसेनेत अस्वस्थता वाढली होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले लवकरच ठाकरेंना जय महाराष्ट्र करतील असे सांगितले जात होते. अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेत पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या बरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ देखील उपस्थित होते.
तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. अनेक वर्षे या मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मात्र शिवसेनेचा पराभव झाला होता. परंतु, या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने येथे बाजी मारली. संदिपान भुमरे खासदार झाले आहेत. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला चांगलं यश मिळालं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. लवकरच महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील.
या निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाने वेग घेतला आहे. नेते मंडळींचं पक्षांतर सुरू झालं आहे. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसत आहे. एकेकाळचे अत्यंत निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकही पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. यात आता छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले यांची भर पडली आहे. या दोन्ही माजी महापौरांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट देखील उपस्थित होते.
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार! मनपा निवडणुकीच्या तोंडावर तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घोडेले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. घोडेलेंना त्यावेळी महापौर करायचेच नव्हतं. ही माझी भूमिका होती. पण, घोडेले बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेबांनी त्यांना मी म्हटलो तर महापौर करेल असं सांगितलं. मीही हो म्हणालो म्हणून घोडेले महापौर झाले. नंदकुमार घोडेले फक्त स्वार्थासाठी आले होते आणि स्वार्थासाठीच तिकडे गेले.