Download App

“ठाकरेंसोबत झाले ते माझ्यासोबतही होऊ शकते” : आयोगाच्या निर्णयावर पवारांनी व्यक्त केली भीती

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगात जे उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thckeray) झाले ते माझ्यासोबतही होऊ शकते. कारण सध्या निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेत नाही, पण निवडणूक आयोगाने स्वतः निर्णय घेतला तर मला चिंता नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या नावाची आणि चिन्हाबद्दलची भीती व्यक्त केली, ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवरही सविस्तर भाष्य केले. (NCP Chief Sharad Pawar talk on Election commission decision)

शरद पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने मला एक नोटीस दिली. आणि त्यांनी या नोटीसमधून चिन्हाबद्दलचे काही प्रश्न उपस्थित केले ते मी दिले. आज हा प्रश्न आम्हाला काळजी करण्यासारखा आहे. कारण निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांचा स्वतःचा असेल तर त्याची चिंता मला नाही. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो निर्णय झाला त्यावरुन असं दिसतं की केंद्र सरकारमधील काही शक्तिशाली घटकांनी त्यात हस्तक्षेप केला. तोच प्रयोग आता आम्हा लोकांच्या बाबतीत होताना दिसत आहे. झाला असं मी म्हणत नाही, पण त्यादिशेने पावलं आहेत. कारण ज्या काही गोष्टी आम्हाला मागितल्यावरुन तर असंच दिसतं.

सोडून गेलेल्यांचे बीडमध्ये डिपॉझिट जप्त होणार : बड्या नेत्याचा मुंडेंसह बंडखोर आमदारांना इशारा

मात्र व्यक्तीशः मला चिन्हाची चिंता नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी आजवर 14 निवडणुका लढलो. लोकांनी मला या सर्व निवडणुकांमध्ये निवडून दिले. पण या निवडणुकांमधील चिन्हे वेगवेगळी होती. पहिली निवडणूक लढलो त्यात बैलजोडी होती. त्यानंतर चरखा, हात, गाय-वासरु आणि शेवटच्या निवडणुकीत घड्याळ होते. त्यामुळे चिन्हाची चिंता मला नाही. मात्र हा सत्तेचा गैरवापर आहे, केंद्र सरकारमधील बसलेले घटक राजकीय पक्षांना अडचणीत आणत आहेत, अशी खंत आणि भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

‘त्या’ प्रकरणाची माहिती मिळाल्यास बर होईल : पवारांनी काढली मुंडेंच्या सुकलेल्या जखमेवरील खपली

शरद पवार यांची उद्या बीडमध्ये सभा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (17 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे. यापूर्वी शरद पवार यांची पहिली सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला या मतदारसंघात पार पडली होती.

Tags

follow us