बीड जिल्ह्यातील आष्टीच्या बँक ऑफ (Bank) महाराष्ट्र शाखेमध्ये चार दिवसापूर्वी झालेल्या वादामुळं येथील सर्व व्यवहार कुंभार पिंपळगाव शाखेत वर्ग करण्यात येत असल्याचा फलक दर्शनी भागात लावण्यात आले. त्यानंतर शेतकरी, सर्वसाधारण खातेदार आणि व्यापारी यांची फजिती उडाली आहे. बँकेच्या या आडमुठ्या धोरणामुळं शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा जीव टांगणीला लागला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत शेतकरी आणि शाखाधिकारी यांच्यात मयत खातेदाराच्या कर्जमाफी तपासणीवरुन वाद झाला होता. वादानंतर शाखाधिकारी आणि शेतकऱ्यांत परस्पर तक्रारीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून बँकेचे कार्यालय बंद अवस्थेत आहे. शिवाय, या शाखेतील बँकिंग व्यवहार पुढील सुचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात कुंभार पिंपळगाव शाखेमार्फत करण्यात येतील, असं फलक लावण्यात आलं आहे. यामुळं खातेदारांतून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
नाराज नगरसेवक, बदलती समीकरणे आणि क्षीरसागर बंधूंची संभाव्य एकजूट; बीड नगरपरिषदेत सत्तांतराची चर्चा
ग्राहक सेवा मार्फत 10 ते 20 हजारापर्यंत आधार सलग्न असलेल्या खात्याचे व्यवहार होतात. मात्र, चेक, मोठी रक्कम, डी. डी. ई केवायसी सह ज्यांचे अंगठे लागत नाहीत अशांना बँकेतच जावं लागतं. आष्टी कुभांरी पिंपळगाव जवळपास 20 किलो मिटरचे अंतर असुन येवढ्या लांबून व्यावहार करणं जिकरीचं बनलं आहे. आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा त्वरित सुरू करावी अशी मागणी होत आहे.अन्यथा मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या आष्टी गावात गेल्या ३० वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा कार्यरत आहे. शाखा व्यवस्थापक हितेश चतुरभाई दामोर यांच्याविरोधात शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरणे, दलालांमार्फत व्यवहार होत असल्याचं तसंच काही नागरिकांशी गैरवर्तन केल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत. 40 किलोमीटरचा प्रवास करून बँकेची कामे करावी लागतील. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तालुका व जिल्हास्तरावर शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा शेतकरी व खातेदार नागरिकांनी दिला आहे.
