छत्रपती संभाजीनगर : वंजारी समाजाने विवाह जुळवताना अडचणीची ठरणारी ‘वाढीभाऊ’ तथा ‘वाढेभाऊ’ ही कालबाह्य पद्धत रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुले आता फक्त जवळचे नातेगोते वगळून 60 आडनावांमध्ये विवाह ठरविता येणार आहेत. पाथर्डीमध्ये येत्या 24 डिसेंबरला वंजारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दिव्य मराठी या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Vanjari community has taken a revolutionary decision to abolish the outdated system Vadhibhau)
राज्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत वंजारी समाजाची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास आहे. यात छत्रपती संभाजीनगर, बीड, नगर, पुणे, नाशिक, बुलडाणा, कल्याण, ठाणे, परभणी, उल्हासनगर, जालना या भागात ही संख्या जास्त आहे. या समाजातील मुलींची घटलेली लोकसंख्या, बदलत्या काळानुसार बदलती विचारसरणी, प्रथा-परंपरा, आणि वाढलेल्या आंतरजातीय विवाहाचे प्रमाण लक्षात घेऊन मागील अनेक दिवसांपासून ‘वाढीभाऊ’ तथा ‘वाढेभाऊ’ ही कालबाह्य पद्धत रद्द करण्याची मागणी पुढे येत होती. अखेर आता या समाजातील ज्येष्ठ लोकांनी ही प्रथा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मूळचा राजस्थानचा असलेला आणि आता महाराष्ट्रात स्थलांतरित होऊन स्थिरावलेला वंजारी समाज आजही अनेक जुन्या परंपरांचे पालन करतो. या समाजात आज घडीला जवळपास 60 आडनावे आहेत. तर ‘वाढीभाऊ’ म्हणजे सगोत्र. या परंपरेनुसार, ‘नगद’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानी व्यक्तीकडे समाजाची संपूर्ण जातकुळी असते. त्यानुसार, संबंधित विवाह जुळवताना तो हे ‘वाड’ वाचून दाखवतो. यात कोणाचे नाते कोणाबरोबर होऊ शकते, याबाबतचा उल्लेख असतो. जर विवाह जुळत नसल्यास आपापल्यात विवाह नको, असे सरळ सांगितले जाते.
दरम्यान, समाजाने घेतलेल्या या निर्णयाला भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले, वाढीभाऊ ही पद्धत आपण यापूर्वीच दूर केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन शिरसाट यांच्या कुटुंबातील अशा पद्धतीचे लग्न माझ्या पुढाकाराने पार पडले. ही पद्धत कालबाह्य असून आंतरजातीय लग्न होण्यापेक्षा जातीमध्ये कधीही लग्न झालेले उत्तम आहे. मात्र सुधारणावादी चळवळीला भगवानगडाचा सदैव पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.