Download App

कर्नाटकच्या तुरुंगातून मंत्री गडकरींना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली हकिकत

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीप्रकरणी अखेर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा छडा पोलिसांनी लावल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या धमकी प्रकरणाची हकिकत मांडली.

ते म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांना आलेली धमकी आम्ही गांभीर्याने घेतली असून त्या कॉलचा शोध घेण्यात आला. धमकीप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

पोलिस यंत्रणेकडून तपास सुरु करण्यात आला. त्यानंतर अखेर हा फोन कर्नाटकातील बेळगावच्या तुरुंगातून आल्याचं निदर्शनास आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. बेळगावच्या तुरुंगातून एका कैद्याने हा फोन केल्याचं समोर आलंय.

या कैद्याने तुरुंगात मोबाईल मिळवून धमकीचा कॉल केला आहे. हा कैदी गेल्या काही दिवसांपासून खूनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे. या कैद्याला खूनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

मात्र, या व्यक्तीने मंत्री नितीन गडकरी यांना का धमकी दिली असावी? धमकी देण्यामागचा नेमका हेतू काय? धमकीच्या फोन मागे दुसरंच कोणी तर नाही ना? यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, तुरुंगात फोन कसा गेला? यासंदर्भात कर्नाटक सरकार कारवाई करणार का? हा कॉल त्यानेच केला की त्याच्या माध्यमातून अन्य कुणी केला याची तपासणी चालू असून सध्यातरी या प्रकरणी प्राथमिक मिळाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

नितीन गडकरी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी आली. या धमकीमध्ये आम्हाला खंडणी द्या, नाहीतर तुमच्या जीवाचं काही खरं नाही, असं त्यांना फोनवरुन सांगण्यात आलं. गडकरींच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला.

नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ नितीन गडकरी यांचं संपर्क कार्यालय आहे. याच कार्यालयात तीन वेळा गडकरी यांच्या कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन आल्याची माहिती समोर आलीय.

Tags

follow us