Ashutosh Kale : समता पतसंस्था व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे राजकारण विरहित समाजाची कामे करत आहेत.ते त्यांच्या कामाबद्दल समाजात लोकप्रिय आहेत त्यामुळे मी आणलेल्या निधीतून कोपरगाव शहराचा जास्तीत जास्त विकास करता यावा यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मी काका कोयटे यांना आग्रह करून त्यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीत विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक पातळी सोडून टीका करीत असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी समता पतसंस्थेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
समता पतसंस्थेबाबत विरोधकांकडून प्रसार माध्यमात चुकीची माहिती पसरविली जात असून सदरची माहिती निराधार व निरर्थक असून त्याबाबत खुलासा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने समता पतसंस्था कार्यालयात पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आ.आशुतोष काळे बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, जितेंद्र शहा व इतर संचालक उपस्थित होते.
आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) पुढे म्हणाले की, ज्यावेळी काकासाहेब कोयटे यांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळी त्यांना मी अगोदरच कल्पना दिलेली होती. विरोधक करून करून समता पतसंस्थेची चौकशी लावणार.परंतु आपण जर काही चुकीचे केलेलंच नाही तर घाबरायचं काहीच कारण नाही. आपला कारभार स्वच्छ आहे, पारदर्शक आहे. सर्वांना विश्वासात घेऊन समता पतसंस्थेचे कामकाज होत आहे तेव्हा आपण बिनधास्तपणे नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार व्हा आणि त्यांची उमेदवारी जाहीर करून मी चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी माझ्यावर टीका करण्याचे काम सुरु होते आता विरोधक काकांवर टीका करत आहे. मात्र हि टीका निवडणुकीत पराभव दिसतं असल्यामुळे होतं आहे. पराभव टाळण्यासाठी ते सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. विरोधकांनी 28 विकासकामांना विरोध केला, पाच नंबर साठवण तलाव होवू नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केल्या. एवढेच नव्हे तर निवडणुकीतही खोडा घातला आहे. चांगल्या कामात खोडा घालायची त्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळे काय चौकशी काय व्हायची ती होईल.कितीही चौकशी लावल्या तरी त्या चौकशीतून काहीही सिद्ध होणार नाही. आमचा विजय निश्चित असल्यामुळे विरोधक बिथरले आहे. जनतेत जाण्यापेक्षा ते अशा गोष्टी करत असून जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजीचा सूर असून त्यामुळे आमचे मताधिक्य वाढनार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे म्हणाले की, संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरे जाने म्हणजे पुण्याचे काम असते असे मी मानत आलेलो आहे. संस्था डबघाईस आली तर ठेवीदारांच्या ठेवी परत देऊ शकलो नाही तर ठेवीदारांचा रोष हा तळतळाट असतो असे मी मानतो. थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्याची पद्धत ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक पतसंस्था वसुलीसाठी समताची पद्धत वापरत आहे. समतेचे माणुसकीचे मंदिर असेल, समताचे उद्योग मंदिर असेल, समता अभ्यास केंद्र या माध्यमातून समता हे नाव लोकांसमोर येते आहे. त्याच्या मुळे त्यांनी समताला टार्गेट करायचे काम चालविले आहे. त्यांना समता नावाची एवढी अलर्जी आहे.ही समताची निवडणूक नाही ही नगरपालिकेची निवडणूक आहे. नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे बोलले पाहिजे पण ते न बोलता आ.आशुतोष काळे यांच्या विकास कामामध्ये अडथळा आणण्याचे आणि खोडा घालण्याचे काम ते करीत आहे. प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका केली नाही. समताच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रम राबविले त्याला आम्ही प्रसिद्धी दिली त्यामुळे त्यांना अलर्जी झाली असे मला वाटते. समताच्या माध्यमातून शेकडो गरजू नागरिकांना जेवणाचे डबे घरोघर पोहचविले जातात. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही हजारो नागरिकांना जेवणं दिले. आम्ही कधीहि त्यांच्यावर टीका केली नाही असे काकासाहेब कोयटे यांनी सांगितले.
यावेळी समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सांगितले की, काही थकबाकीदार अचानक एकत्र आले. नासिक,छत्रपती संभाजी नगर, पुणे यांना एकत्र आणल्या गेलं. ज्या सरकारी कार्यालयात अर्ज दाखल करून संध्याकाळी समताच्या बाबतीत ऑर्डर काढली गेली हे जनतेला माहित असून ए पब्लिक है, ये सब जाणती है असा टोला विरोधकांना लगावला.खोट्या पत्र, क्लिप प्रसिद्ध होतं आहे. त्याबाबत खरं काय हे सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं पत्रकार परिषद घेवून खुलासा करत आहोत.अनेकांनी ठेवीदारांना फोन केले की समता अडचणीत आहे पैसे काढून घ्या मात्र समताच्या ठेवी कमी न होता समताच्या ठेवी दोन दिवसात एक कोटीची वाढ झाली आहे. सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यावर तक्रार दाखल केली आहे. त्याची चौकशी होईल. वसंत घोडके हे थकबाकीदार आहेत.
4-5 वर्षांपूर्वी कर्ज घेतले. तारण ठेवून मात्र त्या कर्जाचा कर्ज त्यांनी वापर व्यवस्थित केला नाही व पैसे भरले नाही म्हणून त्यांना नोटीस दाखल करून सहकार खात्याच्या आदेशाने त्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून वसंत घोडके यांनी अनेक पतसंस्थाना बुडवलं आहे. तसेच कर्जदार संजय मोरे हे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्यांचे कर्ज अनेक वर्ष थकीत आहे. त्यांनी अनेक वेळा सहकार खात्याकडे तक्रारी केल्या त्याबाबत चौकशी होवून काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यांनी उच्च न्यायालयात दावा केला असता उच्च न्यायालयाने 50 हजारांचा दंड ठोठवला आहे. त्यांनी सीबीआय व सीआयडीकडेही तक्रार केली होती तेथेही समता पतसंस्थेला क्लीनचीट मिळाली आहे. याचे सर्व पुरावे संदीप कोयटे यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.
वसंत घोडके यांच्या तक्रारीनुसार जमीन विक्रीतून आलेले पाच कोटी रुपये समता पतसंस्थेने जमा घेतले नाही याचे देखील पुरावे यावेळी सादर करण्यात आले. परंतु काही महाशक्ती जाग्या झाल्या असून अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून चौकशीची कारवाई केली जात आहे. मात्र मतदारांना जे करायचं ते मतदार करणारच आहे. तुम्हाला जी आदळ आपट करायची आहे ती करा असा टोला विरोधकांना लगावला. तुम्ही कुठल्याही प्रकारे आरोप करत राहा आम्ही समर्थ आहोत आणी विजय पण आमचाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
