Bhaskar Jadhav : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलने केली. भिडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर काल विधीमंडळाच्या अधिवेशनातही या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. या निवेदनात मात्र त्यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत उच्चारलेल्या एका शब्दाने विरोधकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला.
संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा मर्डर करेन, सुबोध सावजींची खुलेआम धमकी…
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. भिडेंनी केलेल्या वक्तव्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन सादर केलं. या निवेदनात फडणवीस म्हणाले, अशा प्रकारे राष्ट्रपित्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही. दुसऱ्या बाजूला ते म्हणाले, संभाजी भिडे आमचे गुरुजी आहेत. याचा अर्थ त्यांनी गुरुजींकडून शिक्षा घेतलीय. गुरुजींनी दिलेला धडा राज्यकर्ते म्हणून फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. संभाजी भिडे जर त्यांचे गुरुजी असतील तर याचा अर्थ फडवणवीसांनी मान्य केले आहे की भिडेंना त्यांनीच बोलायला भाग पाडलं. ते आम्हाला मान्य आहे असाच त्याचा अर्थ होतो.
प्रत्येक वेळी दोन तोंडाने बोलणे ही भाजपाची जुनी पद्धत आहे. राम मंदिराबाबत एकाने म्हणायचं न्यायालयाच्या बाजूने निकाल लागू द्या. दुसरीकडे रथयात्रा काढायची. महात्मा गांधी जयंतीदिनी भाजपशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनांनी गांधींच्या फोटोवर गोळीबार करायची आणि त्यांच्या नेत्यांनी मात्र गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत असे म्हणायचे. अशीच भारतीय जनता पार्टीची दुतोंडी नीती आधीपासूनचीच आहे, असे जाधव म्हणाले.