प्रकाशकाला धमकी प्रकरणी आमदार गायकवाड मवाळ; पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबी यांची दिलगिरी व्यक्त

हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा आहे, असे सांगत संबंधित पुस्तकात योग्य ती दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Untitled Design 28

Untitled Design 28

MLA Gaikwad : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशनावरून केलेल्या शिवीगाळ प्रकरणाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून गायकवाड यांनी अश्लील भाषेत दमदाटी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, केवळ पुस्तकाचे कव्हर पाहूनच त्यांनी संताप व्यक्त केल्याची टीका समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात झाली.

या घटनेनंतर गायकवाड यांच्या भूमिकेवर सर्व स्तरांतून प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिसांत तक्रार देण्याचाही प्रयत्न केला, मात्र ती नोंदवली गेली नसल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, महायुतीतील अनेक नेत्यांनी या प्रकरणावर सावध भूमिका घेत थेट भाष्य टाळले. वाद वाढत असताना अखेर संजय गायकवाड यांनी या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अलीकडील वादात आपल्या तोंडून अयोग्य शब्द निघाल्याची कबुली देत त्यांनी मनापासून माफी मागितली.

विवेक कोल्हेंचे राजकीय पुनर्वसन…विधान परिषदेवर वर्णी लागणार?

मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा, या आपल्या भूमिकेवर ते ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा आहे, असे सांगत संबंधित पुस्तकात योग्य ती दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, महाराजांचा एकेरी उल्लेख टाळावा, अन्यथा तो करोडो लोकांच्या भावना दुखावणारा ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना संतुलित भूमिका मांडली. संजय गायकवाड यांनी नेमका कोणता आक्षेप घेतला हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांनी पुस्तक वाचले आहे की नाही, याचीही माहिती घेईन. मी स्वतःही हे पुस्तक वाचून मग यावर सविस्तर चर्चा करेन, असे सामंत यांनी सांगितले. एकंदरीत, एका पुस्तकाच्या आशयावरून सुरू झालेला हा वाद आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आणि राजकीय जबाबदारी या व्यापक मुद्द्यांवर येऊन ठेपला आहे.

Exit mobile version