MLC Election : पार्थ पवारांना धक्का, ज्येष्ठ नेत्यांना चेक; झिशान सिद्दिकींच्या निवडीची इनसाईड स्टोरी

MLC Election विधान परिषदेच्या आखाड्यात राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचा क्लायमॅक्स अखेर समोर आला आहे.

MLC Election : पार्थ पवारांना धक्का, ज्येष्ठ नेत्यांना चेक; झिशान सिद्दिकींच्या निवडीची इनसाईड स्टोरी

MLC Election : पार्थ पवारांना धक्का, ज्येष्ठ नेत्यांना चेक; झिशान सिद्दिकींच्या निवडीची इनसाईड स्टोरी

Zeeshan Siddique MLC Nomination Inside Story : विधान परिषदेच्या आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत गोटात सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचा क्लायमॅक्स अखेर समोर आला आहे. अमोल मिटकरींचा आक्रमक बाणा, रोहन काकडेंसाठी पार्थ पवारांनी लावलेली प्रतिष्ठा आणि आनंद परांजपेंसाठी ज्येष्ठ नेत्यांनी केलेली तटबंदी… या सगळ्या राजकीय चक्रव्यूहाला छेद देत सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेसाठी ‘झिशान सिद्दीकी’ नावाचं असं अस्त्र बाहेर काढलं आहे ज्यामुळे क्षातील बडे मासे चकित झाले आहेत. हा केवळ एक उमेदवारीचा निर्णय नाही. तर, अजित पवारांच्या पक्षात आता सुनेत्रा वहिनींचा शब्द हाच ‘अंतिम शब्द’ असल्याचा मोठा संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे. नेमकी झिशान सिद्दिकी यांच्या विधान परिषदेच्या निवडीची इनसाईड स्टोरी काय? त्याबद्दल जाणून घेऊया…

शिंदेंचा ‘बाण’ अन् कडूंचा ‘प्रहार’; सत्तेत राहून शिंदे-कडू देणार राणांना शह; राजकीय डीलची खरी Story

पार्थ पवारांची प्रतिष्ठा आणि ‘काकडे’ कार्ड

माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव रोहन काकडे आणि पार्थ पवार हे लहानपणापासूनचे जिवलग मित्र आहेत. एकाच शाळेत शिक्षण झाल्यामुळे त्यांच्यातील मैत्रीचे धागे अत्यंत घट्ट आहेत. रोहन काकडे यांना उमेदवारी मिळवून देणे, हा पार्थ पवारांसाठी केवळ मैत्रीचा विषय नव्हता. याद्वारे त्यांना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या पक्षातील ‘चाणक्य’ मानल्या जाणाऱ्या मुरब्बी नेत्यांना आपली ताकद दाखवून द्यायची होती. “पक्षात माझ्या शब्दाला किंमत आहे आणि नव्या पिढीचे नेतृत्व आता निर्णय प्रक्रियेत प्रभावी ठरत आहे,” हा संदेश देण्यासाठी पार्थ पवारांनी हे ‘काकडे कार्ड’ खेळले होते. मात्र, त्यांचा हा हट्ट पूर्ण होऊ शकला नाही.

मिटकरींना विरोध आणि परांजपेंसाठी फिल्डिंग

उमेदवारीच्या शर्यतीत आमदार अमोल मिटकरी यांचे नाव सुरुवातीला आघाडीवर होते, मात्र त्यांच्या आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या शैलीमुळे पक्षातील एका मोठ्या गटाने त्यांच्या नावाला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध दर्शवला होता. तर, दुसरीकडे, ठाण्यातील अनुभवी चेहरा म्हणून आनंद परांजपे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पूर्ण ताकद लावली होती.

पक्षाला विधान परिषदेत प्रशासकीय आणि राजकीय अनुभव असलेला चेहरा हवा, असा या मुरब्बी जोडीचा आग्रह होता. पण, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षणाचे वातावरण सध्या कमालीचे तापलेले आहे. अशा संवेदनशील काळात जर मिटकरी किंवा रोहन काकडे यांसारख्या मराठा नेत्यांना संधी दिली असती, तर पक्ष जातीय राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकण्याची दाट शक्यता होती. त्याशिवाय पार्थ पवारांची पसंती काकडे विरुद्ध ज्येष्ठ नेत्यांची पसंती असलेल्या परांजपे या संघर्षात कोणा एकाची निवड करणे म्हणजे पक्षात उभी फूट पाडण्यासारखे होते.

त्यामुळे पक्षातील ही कोंडी फोडण्यासाठी अखेर सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सर्व संभाव्य राजकीय धोके, जातीय समीकरणे आणि पक्षांतर्गत गटबाजी ओळखून ‘झिशान सिद्दीकी’ यांच्या रूपाने एक सुरक्षित आणि सर्वसमावेशक ‘मधला मार्ग’ काढत झिशान सिद्दीकींना उमेदवारी जाहीर केली. Zeeshan Siddique MLC Nomination Inside Story

Milind Narvekar : ‘बॉस’ राईट, पण नार्वेकरांचा अंदाज फ्लॉप; ‘त्या’ 1 टक्क्याने नार्वेकरांना धक्का…

झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब का?

सुनेत्रा पवारांनी झिशान सिद्दीकी यांची निवड करण्यामागे तीन मुख्य कारणं सांगितली जातात. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे अल्पसंख्याक कार्ड होय. मुंबईतील एक तरुण आणि मुस्लिम चेहरा देऊन पक्षाने सिद्दींकींना उमेदवारी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. कोणा एका गटाचा उमेदवार न निवडता तिसराच चेहरा समोर आणल्याने पार्थ पवार आणि तटकरे-पटेल यांच्यातील संघर्ष या उमेदवारीमुळे तूर्तास शांत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, मराठा राजकारणाच्या तापलेल्या वातावरणात एका मुस्लिम उमेदवाराला संधी देऊन “सोशल इंजिनिअरिंग”चा प्रयोग पक्षाने केल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

थोडक्यात काय तर, रोहन काकडेंच्या निमित्ताने पार्थ पवारांनी टाकलेला डाव आणि आनंद परांजपेंसाठी तटकरेंनी लावलेली फिल्डिंग, या दोघांच्या वादात सुनेत्रा पवारांनी ‘सिद्दीकी’ कार्ड खेळून सर्वांनाच चकित केलं आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत आता सुनेत्रा पवारांचा शब्द ‘फायनल’ असल्याचंही अधोरेखित झालं आहे.

Exit mobile version