काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं निधन झालं. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी आज (30 मे) पहाटे अखेरचा श्वास घेतला. ते 47 वर्षांचे होते. 26 मे रोजी त्यांना नागपूरमध्ये किडनीवरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दिल्लीला हालविण्यात आलं होतं. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी-आमदार प्रतिभा धानोरकर आणि दोन मुले असा परिवार आहे. (Congress MP Balu Dhanorkar Passed Away)
धानोरकर यांच्या पत्नी आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ट्विट करुन दिलेल्या माहितीनुसार, बाळू धानोरकर यांचे पार्थिव आज चंद्रपुरात आणण्यात येणार आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून 31 मे सकाळी 10 वाजेपर्यंत अत्यंदर्शन पार्थिव देह ठेवण्यात येणार आहे. तर 31 मे रोजी सकाळी 11 वाजता वणी-वरोरा बायपास येथील मोक्षधाममध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत.
— Pratibha Dhanorkar (@PSDhanorkar) May 30, 2023
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बाळू धानोरकर यांच्या वडिलांच निधन झालं होतं. मात्र आजारपणामुळे वडिलांच्या अत्यंसंस्कारालाही ते उपस्थित राहु शकले नव्हते. त्यानंतर आता धानोरकर यांच्या कुटुंबियांवर आणखी एक आघात कोसळला आहे.
बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर सरकारी शाळेत शिक्षक होते, त्यामुळे घरात कुठलाच राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं. 4 मे 1975 रोजी यवतमाळमध्ये त्यांचा जन्म झाला. कला आणि कृषी शाखेत शिक्षण घेतल्यानंतर ते व्यवसायाकडे वळाले. त्यांनी सुरुवातील कपड्यांचे दुकान सुरु केले. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी सुरु केली. काहीच दिवसात त्यांनी मद्यविक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली.
गाठीशी थोडा पैसा जमा झाल्यानंतर धानोरकर यांची पावलं राजकारणाकडे वळली. भद्रावती नगरपालिकेपासूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख असा प्रवास करीत युतीच्या काळात त्यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघातून ते निवडून आले. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता.
आक्रमक आणि स्पष्टवक्ता म्हणून बाळू धानोरकर हे राजकीय वर्तुळात ओळखले जायचे. लोकांच्या जगण्यावर थेट परिणाम करणारी कामे करण्याला ते महत्त्व देत. एकाच कामासाठी लोकांना वारंवार येरझाऱ्या घालायला नको म्हणून बाळू धानोरकर परमनन्ट सोल्यूशन काढण्यावर भर द्यायचे. पुन्हा निवडून येण्यापुरती कामे मी कधी करत नाही. लोकांना खोटी आश्वासने देत नाही. माझ्याकडून काम होणार नसेल तर मी लोकांना तसे स्पष्टपणे सांगतो, हा बाळू धानोरकरांचा स्पष्टवक्तेपणा होता. त्यांची ही गोष्टच अनेकांना भावात होती.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २००४ नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. अशात २०१९ च्या निवडणुकीत चंद्रपूरमधून काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्याचवेळी अशोक चव्हाण आणि एका काँग्रेस कार्यकर्त्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आणि बांगडेंची उमेदवारी बदलून अखेरच्या क्षणी शिवसेनेतून आलेल्या धानोरकर यांना देण्यात आली.
खरंतर धानोरकरांना तिकीट द्यायच्या वेळी त्यांचा मद्यविक्रीचा व्यवसाय आणि चंद्रपुरात असलेली दारूबंदी उमेदवारीच्या आड आली. पण धनोरकरांना तिकीट नाकारल्याने मोठा गदारोळ झाला. यानंतर धानोरकर-वडेट्टीवार-अशोक चव्हाण या तिघांनीही मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. अगदी राहुल गांधींपर्यंत फिल्डिंग लावली. बाळू धानोरकर कसे विनिंग कँडिटेट आहेत, हे काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना पटवून दिले. त्यानंतर २०१९ ला बाळू धानोरकर हेच काँग्रेससाठी मॅन ऑफ द मॅच ठरले.
आपल्या याच आक्रमक आणि चिकाटी स्वभावामुळे ते थेट पंतप्रधान मोदींनाही आव्हान द्यायचे. ‘पक्षाने आदेश द्यावा, मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’ असं म्हणतं धानोरकर यांनी मोदींविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली होती. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे बाळू धानोरकर यांनी म्हटले होते. पण आज धानोरकर यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसला मागील पाच वर्षात आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार चंद्रकांत जाधव, खासदार राजीव सातव या लोकप्रतिनिधींच्या जाण्याच्या रुपाने मोठे आघात सहन करावे लागले. आणि आता बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसला आणखी एक आघात सहन करावा लागला आहे.