Manoj Jarange Movement in Mumbai : राज्यात सुरू असलेला गणेशोत्सव आणि मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन यामुळे सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तातडीने ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठा आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आल्याने (Jarange) बंदोबस्तासाठी सध्याची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस दलातील सशस्र पोलीस दल नायगावच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पत्राद्वारे हा आदेश देण्यात आला आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलानाचे स्वरुप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलीसअसणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जरांगे यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस पूर्ण झाला. पहिल्या दिवशीच मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे आंदोलन अजून किती दिवस चालेल हे निश्चित नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
हा मराठ्यांनी मुंबई सोडून जाण्यासाठीचा डाव; मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात आक्रमक
काय म्हटलंय निवेदनात?
सदर ज्ञापनाव्दारे आपणांस असे आदेशित करण्यात येते की, गणेशोत्सव सणाचे निमित्ताने तसेच मराठा आरक्षण मागणीचे अनुषंगाने मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेले मराठा बांधव यामुळे कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याचे दृष्टीने वरिष्ठांकडून तसंच, पोलीस नियंत्रण कक्षाकडून वारंवार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देणेबाबत आदेशित होत आहे. सदर मनुष्यबळाची पूर्तता करणे क्रमप्राप्त असून त्याकरिता या आस्थापनेवरील रूग्णनिवेदन / गैरहजर / अर्जित रजा/ किरकोळ रजेवर असलेले पोलिस अंमलदार यांना तात्काळ कर्तव्यावर हजर होणेबाबत सूचित करून त्यांना कर्तव्यावर उपस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
यास्तव, आपण कंपनी लेखनिक / सहलेखनिक म्हणून आपले कंपनीतील रूग्णनिवेदन / गैरहजर / अर्जित रजा / किरकोळ रजेवर असलेले पोलीस अंमलदार यांचेशी संपर्क साधून त्यांना गणेशोत्सव व मराठा आरक्षणाचे अनुषंगाने जमा झालेल्या जनसमूदायाची माहिती देवून कायदा व सुव्यवस्थेचे अनुषंगाने बंदोबस्ताकामी संबंधित पोलीस अंमलदार यांची नितांत आवश्यकता असल्याचे कळवून त्यांना तात्काळ कर्तव्यावर हजर होणेबाबत सूचित करून त्यांना कर्तव्यावर उपस्थित करावे.