मुंबई : प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी
नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज (Dr. Shankrao Chavan Medical College) व रुग्णालयात चोवीस तासांत चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात औषध उपचार न मिळाल्याने वीस बालके दगावली आहे. आता त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. सरकारी रुग्णांना औषधे का मिळत नाही, याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकपदाच्या राजकीय स्पर्धेमुळे औषध खरेदीचा घोळ निर्माण झाल्याचे समोर येत आहे. या मेडिकल कॉलेजचे डीन दिलीप म्हैसेकर (Dr. Deelip Mhaisekar) हे बारा वर्ष ज्युनिअर असताना त्यांना मुंबईत संचालकपदावर अतिरिक्त कारभार देण्यात आला. तर नांदेड मेडिकल कॉलेजचा कारभार डॉक्टर वाकोडे यांच्याकडे देण्यात आला. तात्पुरत्या काळासाठी आलेल्या वाकोडे यांना आधिकार नसल्याने औषध खरेदी केली नाही का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘दोषींवर कडक कारवाई करा’; नांदेडच्या घटनेवरुन चित्रा वाघ यांचा संताप
राज्यात वैद्यकीय शिक्षण संचालकपदावरुन राजकीय आणि प्रशासकीय संघर्ष सुरू आहे. यातून वैद्यकीय शिक्षण विभागात अनास्थेचे वातावरण निर्माण झाल आहे. वैद्यकीय शिक्षण संचालकपद रिक्त होते. त्या पदाचा कारभार अतिरिक्त संचालक म्हणून डॉ. चंदनवाले यांच्याकडे होता. पण त्यांना बाजूला करण्यात आले. त्यांच्या समकक्ष असलेल्या जेजेच्या डीन पल्लवी सापळे, डॉ संजय ठाकरे , डॉक्टर नंदकर अथवा डॉ मनीषा वऱ्हने यांना यापदावर नियुक्ती दिली जाणे अपेक्षित होते. पण या सर्वांना बाजूला करत या पदावर बारा वर्ष ज्युनिअर असलेल्या नांदेड मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांना तात्पुरते पदावर बसवण्यात आले. या पदावर बसवण्यासाठी कुठल्या मापदंड लावण्यात आले? म्हैसेकर यांनी तत्काळ नांदेडचा चार्ज सोडला आणि मुंबईत दाखल झाला. म्हैसेकर यांच्या जागी नांदेड डीन म्हणून डॉक्टर वाकोडे याना बसवण्यात आले. या पदावर येण्यास नाखूष असताना देखील वाकोडे यांच्याकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘एकाच दिवसांत एवढे मृत्यू..,’; नांदेड घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
तात्पुरता चार्जमुळे औषध खरेदीचे अधिकार मर्यादित आहेत. त्यात या पदावरून राजकारण सुरू आहे. म्हैसेकर यांच्या पदाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. हे वाद टोकाला गेल्याने औषध खरेदीच्या वादात पडणे वाकोडे यांनी टाळले का ? यावर देखील वैद्यकीय शिक्षण विभागात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. याच औषध खरेदीच्या अभावाने वीस बालकांचा मृत्यू झाला आहे का? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
म्हैसेकर ज्युनिअर असताना त्यांना संचालकपदाचा अतिरिक्त कारभार देणे आणि या कारभारासाठी नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार वाऱ्यावर सोडण्यात आला का? म्हैसेकर यांच्यासाठी कुठली राजकीय शक्ती काम करत होती का ? हा देखील शोधाचा विषय आहे. पण या पदाच्या स्पर्धेने वीस बालकांना हकनाक जीव गमवावा लागला का ? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वैद्यकीय शिक्षण विभागात होऊ लागली आहे.