Download App

शरद पवारांची राष्ट्रवादीतूनच कोंडी! मोदींसोबतच्या उपस्थितीला महाविकास आघाडीचा तीव्र विरोध

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या मंगळवारी (1 ऑगस्ट) एकाच मंचावर येणार आहेत. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी पुण्यात 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या कार्यक्रमसाठी शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. पण या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच आता पवारांनी मोदींसोबत व्यासपीठावर उपस्थित राहु नये, त्यांचा सत्कार करु नये अशी राष्ट्रवादीतूनच मागणी होत आहे. (NCP demanding that Sharad Pawar should not attend the platform with Prime Minister Narendra Modi and should not felicitate him)

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून पवार आणि मोदी यांच्या एकत्र येण्यास विरोध केला जात आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचं शिष्टमंडळ रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , आम आदमी पक्ष आणि सीपीआय(एम) या नेत्यांचा समावेश आहे. पवारांचा हा निर्णय “योग्य वाटत नाही” असं शिवसेना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटले आहे. मात्र त्याचवेळी पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असल्याची भूमिका घेतली आहे.

‘आनंद दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका, ते निष्ठावंत शिवसैनिक’; राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला उद्ध्वस्त केले आहे आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याच मोदींचा सन्मान करणे योग्य वाटत नाही. भाजपने राष्ट्रवादीचे फक्त दोन तुकडे केले नाहीत तर सर्वात भ्रष्ट पक्ष म्हणून पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे वर्णन केले आहे.

राष्ट्रवादीला एवढा त्रास झाला असूनही ते पंतप्रधानांचा सत्कार कसा करणार? यामुळे पवार स्वतःच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहून ते चुकीचे संकेत देतील, त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. अजित पवार यांच्या बंडाला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांना आणि समर्थकांना वाटू शकते. यामुळे त्यांनी पवारांनी कार्यक्रमाला जाणे टाळावे, असे मला वाटते.

नितीशकुमारांशी आमचे चांगले संबंध, ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात; आठवलेंचं मोठं विधान

या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे पुणे शहाध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, सर्वपक्षीय शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटून कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी विनंती करणार आहे. आज संध्याकाळी ते मुंबईहून पुण्याला येण्याची शक्यता आहे, त्यानंतर आम्ही त्यांना भेटण्याचा विचार करत आहोत आणि त्यांना कार्यक्रमातून बाहेर पडण्याची विनंती करू, असेही त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, पवारांचा निर्णय अजित पवारांच्या नेतृत्वातील तथाकथित बंडखोरीला पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. मला वाटतं ही सगळी ‘नौटंकी’ होती. या कार्यक्रमाला उपस्थित राहून पवार भाजपच्या कृत्याला वैधता देणार आहेत. तुमच्या पक्षाचे दोन तुकडे केल्यानंतरही तुम्ही एकाच व्यक्तीचा गौरव करत आहात. हे कल्पनेपलीकडचे आहे. काही शतकांपूर्वी राजे-महाराजे पुरोहितांपुढे नतमस्तक व्हायचे. तीच मानसिकता आजही आहे. ते तत्त्वे, मूल्ये आणि नैतिकतेबद्दल बोलतात, पण ते गुण कुठे आहेत? ते अशा गुणांना पायदळी तुडवतात आणि काहीही चूक केलेली नसल्याचा आव आणतात.

‘हा त्यांचा निर्णय आहे’ : काँग्रेसची भूमिका :

पवार यांची भेट घेणार्‍या शिष्टमंडळात काँग्रेस सहभागी होणार असली तरी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, “आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत शरद पवार यांनी स्वतःच निर्णय घ्यावा, असे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय त्यांच्यावर सोडतो. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांच्या निर्णयावर भाष्य करण्यास नकार दिला. “हा त्यांचा निर्णय आहे आणि त्याबद्दल तेच अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. मी काहीही बोललो तर त्यामुळे युतीत मतभेद होतील, मला असे होऊ द्यायचे नाही. महाविकास आघाडी अबाधित राहावी अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले.

Tags

follow us