Download App

“ए स्टॅम्प पेपर आणा रे…” : नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांची धीरगंभीर आवाजात पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. हे दोन्ही कार्यकारी अध्यक्ष आता पक्षाचे प्रमुख या नात्याने काम करणार आहेत. याशिवाय सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगेंद्र शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. मोहम्मद फैजल अशा नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करत त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. ( NCP leader Ajit Pawar on the appointment of Supriya Sule and Praful Patel as the party’s working presidents.)

मात्र या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्यकारी अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने उठून निघून गेले. यामुळे देखील पवार नाराज आहेत का? असा सवाल विचाराला जात आहे. यावर स्वतः शरद पवार, जयंत पाटील यांनी अजितदादा नाराज नसल्याचे सांगत या चर्चांचे खंडन केले. आता खुद्द अजित पवार यांनीही आपण या निर्णयावर आनंदी असल्याचं सांगत, सुप्रिया सुळे यांच्या कार्यकारी अध्यक्ष निवडीच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

खरंतर आमची एक कमिटी केली होती. त्यात आम्ही 15 ते 17 जण होते. त्यात आम्ही 2 निर्णय घेतले. एक तर शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा. तर सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करावी असं मी सुचविलं होतं. त्यावर मला अन्य जणांनी सांगितलं की, आता काय तुम्ही विषय वाढवू नका. आता फक्त पवार साहेबांच्या राजीनाम्यावर निर्णय घेऊ. बहुसंख्यांकाच्या मताचा आदर करत मी पण त्याला होकार दिला.

पण मला असं वाटतं की नवीन नेतृत्व पुढे आलं आहे. आज प्रफुल्ल पटेल तर अनेक वर्ष केंद्राच्या राजकारणात आहेत. सुप्रिया अनेक वर्ष बारामतीचे लोकसभेत प्रतिनिधित्व करते. उत्तम संसदपटू म्हणून नावाजलेलं आहे. ती पण जास्तीत जास्त दिल्लीतच असते. सुरुवातीच्या काळात सुप्रिया राजकारणात आल्यानंतरही दोन शक्तीकेंद्र वगैरे चर्चा सुरु झाल्या होत्या. पण मी त्याही वेळी सांगितलं होतं की, मी राज्याच्या राजकारणात आहे. त्या राष्ट्रीय राजकारणात राहतील.

काही माध्यमांमध्ये अशाही बातम्या चालल्या की अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. पण माध्यमांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, अजित पवार यांच्यावर राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी आहे आणि मी ती पार पाडत आहे. त्यामुळे अशा चर्चा थांबवा. यानंतर एक माध्यम प्रतिनिधीने दादा तुम्हाला कोणत्या राजकारणात रस आहे, असा प्रश्न विचारताच अजितदादा यांनी जोर देऊन महाराष्ट्रातील असं सांगितलं. सोबतच स्टॅम्प पेपर आणा, लिहून देतो, असं म्हणतं मला राज्याच्या राजकारणातच राहायचं असल्याचं स्पष्ट केलं.

Tags

follow us