मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नेमके कोणाच्या बाजूने उभे राहणार हा सस्पेन्स अखेर संपला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मलिक सत्ताधारी रांगेत शेवटच्या बाकावर बसलेले दिसून आले. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) की उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या प्रश्नावर आता स्वतः मलिक यांनीच उत्तर दिले आहे. (NCP leader and MLA Nawab Malik Ajit Pawar joined the group)
आतापर्यंत मलिकांची ओळख शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून आहे. मलिक तुरुंगातून बाहेर पडताच त्यांचे अजित पवार (Ajit Pawar) गटासह शरद पवारांच्या गटातील नेत्यांनी जंगी स्वागत केले होते. दरम्यान, मलिकांसाठी त्यांच्या मुलीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मलिकांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी समीर वानखेडेंसोबत, सीबीआय, भाजप आणि ईडी या सर्वांसोबत एकाच वेळी नवाब मलिक यांनी संघर्ष करावा लागला. 20 वर्षापूर्वींच्या एका जमिन व्यवहारांत त्यांना ईडीने अटक केली. दोन वर्षांत मलिक यांना वैद्यकीय जामिनही मिळाला नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. मलिक यांच्या निकालाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवार समर्थकांनी ढोल-ताशे आणि फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले.
त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी अजित पवार समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. अनिल देशमुखानंतर नवाब मलिक यांना अटक झाली होती. तर हसन मुश्रीफ यांच्यावर टांगती तलवार होती. त्यावेळी अनेक नेत्यांनी मलिक यांच्या विषयावर बोलणे टाळले होते. मात्र सुप्रिया सुळे यांनी थेट कारागृहात जात नवाब मलिक यांची भेट घेतली होती. मलिक यांच्या कुटुंबीयांनी देखील अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी कायम संपर्क ठेवला होता.