सोलापूर : विजापूर बायपास (Vijapur Bypass) रस्त्यावर एकाचवेळी तब्बल 12 काळविटांचा मृत्यू झाला आहे. तर 3 काळवीट जखमी झालेत. काळविटाच्या कळपाला रस्त्यावरील अंडरपास अंदाज न आल्याने साधारणपणे 35 फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडली. आणि त्यात काळवीटांचा मृत्यू झाला.
हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला. नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख वस्ती परिसरात ही घटना घडली आहे.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. जवळपास 12 हरणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. काळवीटांचा कळप माळरानावर अन्न-पाण्याच्या शोधात फिरत होता.
त्यावेळी काही भटकी कुत्री कळपांच्या मागे लागल्याने काळवीट रस्ता मिळेल त्या दिशेने सुसाट धावत होती. देशमुख वस्ती परिसरात नवीन बायपास रस्ता लगतच्या सर्व्हिस रस्तानंतर अचानक 30 फुट खोल भुयारी मार्ग केलेला आहे.
माळरानावरून सर्व्हिस रोडकडे पळत आलेल्या काळवीट पुढे रस्ता असेल असे समजून टाकलेली उडी 30 फूट भुयारी रस्त्यावर पडली. उंचावरून डोक्यावर आदळल्याने काळविटाचा जागीच मृत्यू झाला.