ADCC Bank : सहकार पॅनलचा 17 जागांवर विजय, सुजय विखेंनी मतदारांचे मानले आभार!

अहिल्यानगर जिल्हा बॅंक निवडणुकीत 17 जागांवर विजय मिळवल्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले आहेत.

Sujay Vikhe On Nilesh Lanke

Sujay Vikhe On Nilesh Lanke

Sujay Vikhe News : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत सकार विकास आघाडीने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवल्यानंतर माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत मतदारांचे आभार मानले आहेत. या विजयानंतर सुजय विखे यांना अध्यक्षदावरुन सवाल करण्यात आल्यानंतर विखे यांनी अनेकजण इच्छूक असल्याचं सांगत थेट अनेकांची नावेच घेतली आहे. ते अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी माझ्यासहित अनेक विजयी उमेदवार इच्छूक आहेत. अनेकांनी माझ्याजवळ बोलूनही दाखवलं आहे. रणजितसिंह देशमुख राज्याच्या दूध संघाचे संचालक राहिलेले आहेत. त्यांनीही मला इच्छा असल्याचं बोलून दाखवलंय. अनुराधा नागवडे ताईंनीही मला ओझरतं सांगितलं आहे की, दादा मला कुठं संधी देता येत असेल तर पाहा, असे अनेकांनी मला गुप्त सांगितलंय. अध्यक्षदावरुन सुखद धक्का मिळेलच, ज्याचं नाव जाहीर होईल त्यातून तुम्हालाही समाधान होईलच. अध्यक्षपदावरुन सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय प्रक्रिया राबविण्यात येईल. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पसंतीनेच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय होईल, असेही सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

तसेच सहकार विकास आघाडीच्या १८ उमेदवारांपैकी १७ उमेदवार विजयी झाले आहेत. अकोले तालुक्यातील गोविंद शिंदे यांनी अकोले सोसायटी मतदारसंघातून विजय मिळविला आहे. एका जागेचा अपवाद वगळता आघाडीला सर्वत्र यश मिळाले. या विजयाचे श्रेय जिल्ह्यातील मतदारांना जाते. त्यांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेली संधी याला कधीही तडा जाऊ देणार नाही. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत सर्व उमेदवार तुल्यबळ असतात. त्यामुळे काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही, तरी त्याकडे फार मोठी घटना म्हणून पाहण्याची गरज नाही. सहकार क्षेत्रात निवडणूक होणे ही लोकशाही प्रक्रियेचाच एक भाग आहे. या निवडणुकीत कुठेही चिखलफेक किंवा वैयक्तिक टीका झाली नाही, ही समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पारनेरच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली…
पारनेरमधील निकालाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, एका बाजूला खासदार आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही लढत होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माझा उमेदवार पराभूत झाला असून, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. तसेच पारनेरच्या विजयाबद्दल खासदार निलेश लंके यांचे अभिनंदन आहे.

दरम्यान, अकोले सोसायटी मतदारसंघातून निवडून आलेल्या संजीवनी शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे सहकार विकास चे संख्याबळ 18 झाली आहे. या विजयाबद्दल खासदार सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार मानले. मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू आणि सर्वांना सोबत घेऊन जिल्हा बँकेची पुढील वाटचाल करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Exit mobile version