अहमदनगर: रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ चार्लोट हॉल (अमेरिका) यांच्या संयुक्त विद्यमाने क्लबच्या पहिल्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत ‘नवजात शिशू न्यूरोक्रिटिकल केअर मशीन व प्रशिक्षण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटल येथे हा कार्यक्रम झाला. पहिल्या मशीनच्या सेटचे लोकार्पण झाले.ग्लोबल ग्रँटच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या मशीनच्या सेटचा लोकार्पण सोहळा लवकरच प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या विखे पाटील मेडिकल हॉस्पिटल प्रवरा लोणी येथे होणार आहे.
या लोकार्पण सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे रो. डॉ. महेश कोटबागी यांनी आपल्या भाषणात सांगितले, “रोटरीचे खरे बळ हे एकत्रित कार्य आणि समाजसेवेच्या भावनेत आहे. या प्रकल्पामुळे नवजात शिशूंना उत्तम आरोग्यसेवा मिळणार आहे.” स्वाती हेरकल यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला की “रोटरीचे ध्येय ‘सेवा परमो धर्म’ हे केवळ शब्द नसून, ते आपल्या कृतीतून सिद्ध होते. या प्रकल्पाने आपले ध्येय साध्य केले आहे.”
कार्यक्रमाला अहमदनगर शहरातील ७ रोटरी क्लब्स आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६ रोटरी क्लब्सच्या सदस्यांनीही हजेरी लावली होती. अध्यक्ष रोटेरियन हरीश नय्यर म्हणाले, रोटरी सेंट्रलच्या प्रत्येक सदस्याच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि जिल्हा गव्हर्नर स्वाती हेरकल यांच्या मार्गदर्शनामुळे ही ग्रँट शक्य झाली आहे.” तसेच, त्यांनी दी रोटरी फाउंडेशनचे आणि टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन व पायोनियर मेडिकल रिसर्च फाउंडेशन(अमेरिका) चे डॉ. नितीन चौथाई यांनी ग्राँट करीता त्यांनी दिलेल्या भरीव मदतीकरिता व मार्गदर्शन करीत त्यांचे विशेष आभार मानले.
या ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात रोटरी फाउंडेशन तर्फे अंदाजे ३० लाख रुपये मूल्याच्या मशीन विखे पाटील हॉस्पिटल येथे देण्यात आली. दुसरी मशीन लवकरच लोणी प्रवरा येथील विखे मेडिकल हॉस्पिटल यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण नगर जिल्ह्यातील व महाराष्ट्राचे काही जिल्ह्याचे जवळपास ३५० बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसाठी सदर मशिनरी बाबतचे विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे, असे ईश्वर बोरा यांनी सांगितले.
पीडीजी शिरिष रायते यांनी अद्यापपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात सदर मशिनरी उपलब्ध नसल्याने, रोटरी सेंट्रल मार्फत नगर दक्षिण आणि नगर उत्तर अशा दोन्ही कडील लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी सदर दोन हॉस्पिटलची निवड करण्यात आल्याचे सांगितले. तसेच या सुविधेमुळे नवजात मुलांच्या बाल मृत्युदर कमी होण्यास मदत होईल असेही त्यांनी नमूद केले. डॉक्टर सुरेश वायदंडे यांनी उपस्थितांना वैद्यकीय भाषेतून सदर मशीनचे नवजात शिशूंसाठीचे महत्त्व आणि गरज समजावून दिले.
यावेळी विखे पाटील फाउंडेशन चे वैद्यकीय संचालक डॉ. अभिजित दिवटे, डीन डॉ. सुनील नाथा म्हस्के, डॉ. पाडळकर आदी वैधकीय स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे फाउंडेशनचे ब्रिगेडियर डॉ. त्यागी यांनी रोटरी सेंट्रलने या मशीनसाठी विखे पाटील हॉस्पिटलची निवड केल्याबद्दल रोटरी सेंट्रलचे आभार मानले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी रोटरीच्या या कामास शुभेच्छा देत भविष्यात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाचे संचालन मास्टर ऑफ सेरेमनी रोटरी जिल्हा ३१३२ चे यूथ सर्व्हिसेस चे डायरेक्टर व पब्लिक इमेज डायरेक्टर रो. ईश्वर बोरा यांनी, डॉ. सतीश मोरे आणि क्लब फॅसिलिटर रो. प्रसन्ना खाजगीवाले यांच्या सहकार्याने केले. सचिव डॉ. कुणाल कोल्हे यांनी आभार मानले.