Ahmednagar Corporation : आज अहमदनगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. आयोजित सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे (Sachin Shinde)व भाजप नगरसेवक मनोज कोतकर (Manoj Kotkar)यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. हा वाद मिटविण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी मध्यस्थी केली. मात्र या वादामुळे महापालिकेच्या सभेचे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.
Karnatak Election : भाजपचे नॅनोत बसतील इतकेच आमदार येतील; पटोलेंनी खिजवले
महापालिकेत आज सर्वसाधारण सभा होती. या सभेत केडगावचा पाणी प्रश्न मनोज कोतकर यांनी मांडला. केडगाव उपनगर हे अहमदनगर शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे. या ठिकाणी नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे. या भागात सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आता अहमदनगर शहराला अमृत पाणी योजनेचे पाणी येणार आहे. तरी प्राधान्यक्रमाने केडगाव उपनगराचा विचार करून दिवसाआड पाणीपुरवठा करावा. जेणेकरून नागरिकांचा पाणी प्रश्न मिटला जाईल, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी महापालिकेच्या सभेत केली.
यावेळी जल अभियंता परिमल निकम यांनी सांगितले की, अमृत पाणी योजनेचे पाणी शहरात येणार आहे. पाण्याचे नियोजन करून नक्कीच केडगाव उपनगराला दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रयत्न करु असेही ते म्हणाले.
मनोज कोतकर म्हणाले की, केडगाव देवी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात, भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हायमॅक्स दिवा बसवून देण्यात यावा, अशी मागणीही कोतकर यांनी केली. यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तातडीने दिवा बसविण्याचे काम केले जाईल, असे सांगितले.
कोतकर हे अशी मागणी करत असतानाच शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी आयत्या वेळचा विषय घेण्याची मागणी केली. त्यामुळे कोतकर संतापले. कोतकर यांचा पारा चढताच शिंदे यांनीही त्यांना विरोध करायला सुरुवात केली. त्याला शिवसेना नगरसेवक श्याम नळकांडे यांनीही कोतकर यांना विरोध सुरु केला. त्यामुळे सुरु झालेल्या शाब्दिक चकमकीने वैयक्तिक टीका टिपन्नीचे स्वरूप धारण केले. त्यामुळे सर्व पक्षीय नगरसेवकांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. वाद थांबताच पुन्हा सभा सुरू करण्यात आली.