Ahmednagar News : चार महिलांची हत्या केल्याचा आरोप आणि एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या अण्णा वैद्य या सीरियल किलरचा जमावाकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने त्याला घरातून ओढून आणत बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबर मार बसल्याने अण्णा वैद्यचा मृत्यू झाला. या घटनेने सगळ्या जिल्ह्यातच खळबळ उडाली आहे. असं नेमकं काय कारण होतं की लोक त्याच्या जीवावर उठले. त्यानं असं काय केलं होतं की लोकांचा राग इतका धुमसला, याची कारणं जाणून घेऊ या..
मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य याला काही वर्षांपूर्वी विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केलं होतं. मोटारींचा शोध घेण्यासाठी शेतात गेले असता तेथे चार महिलांच्या मृतदेहाचे सांगाडे सापडले त्यानंतर मोठं खून प्रकरणच उघडकीस आलं. चार महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह शेतात पुरून ठेवल्याच्या आरोपावरून वैद्य याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. वैद्य याला एका महिलेच्या खून प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा उच्च न्यायालयात रद्द करण्यात आली होती. दुसऱ्या एका खून प्रकरणात न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली होती. तर तिसऱ्या खून प्रकरणात न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयात नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावर तो सुगाव (ता. अकोले) येथे राहत होता.
Ahmednagar : अल्पवयीन मुलीची छेड, जमावाचा हल्ला; सिरीअल किलर अण्णा वैद्यचा मृत्यू
या प्रकारानंतर त्याच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती त्याला काही शांत बसू देत नव्हती. दोन दिवसांपूर्वी अण्णा वैद्य याने एका मुलीला मारहाण केली. छेड काढण्याचाही प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्याने तिचे नातेवाईक जमा झाले. तरीदेखील अण्णा वैद्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने येथे जमलेल्या लोकांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मग काय जमावही आक्रमक झाला. त्यांनी अण्णा वैद्यला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र त्याला मृत घोषित केले.
अण्णा गुन्हेगारीकडे कसा वळला
अण्णाचे आई वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे तो एकटाच राहत होता मात्र काही काळानंतर त्याचे लग्न झाले. तीन मुली व एक मुलगा असा अण्णाचा परिवार होता. मात्र अण्णाने केलेलं हत्याकांड उघडकीस आलं त्यामुळे त्याची पत्नी मुलांसह मामाच्या गावी निघून गेली.