अहिल्यानगर: आपल्या देशातील लोकांनी शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणावर भर दिला पाहिजे. आज शिक्षणामुळे आपल्याला जगाचे दरवाजे उघडले आहेत. जुन्या काळात माझ्या निरक्षर आईला शिक्षणाचे महत्त्व कळाले होते. त्यामुळे तिने मला गाव सोडून दुसरीकडे शिक्षणासाठी पाठविले आहे. त्यामुळेच मी आज जगभर संशोधनाचे काम करू शकलो. आज देशातील मुली शिकल्या तर ते घराचे नाव उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन अमेरिकेचे संशोधक व शास्त्रज्ञ बाबासाहेब रखमाजी सोनवणे (babasheb Sonwane) यांनी केले. ( American scientist Babasaheb Sonawane is honored in his homevillage)
नगर तालुक्यातील नांदगांव-शिंगवेचे सुपुत्र असलेले बाबासाहेब रखमाजी सोनवणे हे गेल्या पन्नास वर्षांपासून अमेरिका व इतर देशात संशोधक व शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. त्यांचा गणराज क्रीडा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार आघाव-पाटील व हनुमान तरुण मंडळाच्या वतीने गावात सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्थेच्या दीपलक्ष्मी म्हसे, नांदगावचे सरपंच सखाराम सरक, उपसरपंच नाथा सरक, बाळासाहेब वरपे, माजी सरपंच विश्वास जाधव, व्यावसायिक चारुदत्त पवार, गणेश आघाव, अशोक काळे, अॅड. विक्रम आघाव, अॅड. वैभव आघाव, शामराव सोनवणे, सुधाकर जाधव, चंद्रकांत पुंड, म्हाळू महाराज डोईफोडो, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब शंकपाळ, बाळासाहेब सोनवणे, समीर सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शास्त्रज्ञ बाबासाहेब सोनवणे यांनी आपला जीवनपट उलगडविला. त्यावेळच्या सामाजिक आणि गरिब परिस्थितीत शिक्षण घेऊन कसे पुण्यात आणि नंतर अमेरिकेत संशोधन घेण्यासाठी कसे गेले होतो. पुन्हा देशात येऊन देश, गावाची सेवा कशी करत आहोत, असा प्रवास सांगितले. ते म्हणाले, प्रत्येकाने मोठी महत्वाकांक्षा जीवनात ठेवावी, जीवनात चांगले कर्म करून मोठे झाले पाहिजे. समाजाचे देणे दिले पाहिजे. आता शिक्षणावर भर द्या, मुलीं खूप शिकवा. कारण मी जगात चाळीस देशात गेलो आहे. तिथे शिक्षणामुळे कशी प्रगती होते हे मी पाहिले आहे. त्यामुळे जाती-पातीचे भांडणे, भेदभावापेक्षा शिक्षण, आरोग्य, प्रगती सर्व महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक गाव हे स्वच्छ, सुंदर झाले पाहिजे. मुलांचे शिक्षण झाले आहे. आरोग्य चांगले पाहिजे, हे आवश्यक आहे. गावातील जुन्या आठवणी सांगताना बाबासाहेब सोनवणे यांना गहिवरून आले.
राजकारण्यांना प्रश्न करा
आपल्या गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पुढे आले पाहिजे. गावात आलेल्या राजकारण्यांना प्रश्न विचारले पाहिजे. आमच्या गावांसाठी काय करणार आहात, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला पाहिजे, असे सोनवणे म्हणाले.
सोनवणे यांच्यामुळे देशातील पेट्रोलमधील शिसे कमी झाले
शास्त्रज्ञ बाबासाहेब सोनवणे यांनी भारतात विक्री होणाऱ्या इंधन म्हणजे पेट्रोलवर एक संशोधन केले होते. देशात पेट्रोलमध्ये शिसे जास्त वापरले जाते. त्यामुळे त्याचे मानवावर परिणाम होतो, असे त्याचे संशोधन होते. हे संशोधन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारपर्यंत गेले होते. त्यानंतर सरकारने पावले उचलत, पेट्रोलमधील शिसे या धातूचे प्रमाण कमी केले.
