पोरीसोबत इथं का बसला विचारले; संतापलेल्या तरुणांचा थेट मंदिराच्या विश्वस्तावर कोयत्याने हल्ला

Ahilyanagar- प्रकाश ज्ञानदेव सप्रे 39 वर्षीय जखमी विश्वस्ताचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ahilyanagar Crime

Ahilyanagar Crime

अहिल्यानगर-नगर शहरात किरकोळ वादातून मारहाणीच्या घडत आहे. आता तर थेट मंदिराच्या विश्वस्तावर टोळक्याने हल्ला केला आहे. शहरातील बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर टोळक्याने कोयता आणि लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केल्याची घटना घडली. प्रकाश ज्ञानदेव सप्रे (वय 39, रा. बोल्हेगाव रस्ता, सप्रे मळा, नागापूर) असे जखमी विश्वस्ताचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदिरात रात्रीच्या वेळी एका मुलीसोबत बसलेल्या तरूणाला हटकल्याच्या रागातून हा प्रकार घडलाय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. (Asked why he was sitting here with girl; Angry youth directly attack temple trustee Ahilyanagar)

याप्रकरणी जखमी सप्रे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओम आप्पा कनगरे, अनुष आप्पा कनगरे, लकी कदम, ज्ञानु आमले, आदेश गायकवाड, आदित्य कवडे, सोनु कोलते (सर्व रा. बोल्हेगाव) व इतर तीन ते चार अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी प्रकाश सप्रे हे रात्री 10 च्या सुमारास मंदिरात गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी ओम कनगरे हा एका मुलीसोबत बसलेला दिसला. सप्रे यांनी त्याला एवढ्या रात्री येथे काय करतो, असे विचारले. याचा राग मनात धरून ओम याने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच अनुष कनगरे व इतर साथीदार तेथे आले. त्यांनी सप्रे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. मंदिराचे सुरक्षारक्षक आणि नातेवाईक मदतीला धावून आल्याने सप्रे यांचा जीव वाचला. हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी ओम आणि अनुष कनगरे या दोघांना जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version