अहमदनगर : देशातील सर्व यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देश विरोधी लोकांना मान्य नाही. षडयंत्र रचून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव राबविला गेला आहे. देशात अघोषित आणीबाणी आजपासून सुरू झाली आहे. याविरुद्ध स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी आता देशीवासियांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
गांधींच्या खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह समाजाच्या विविध स्तरांमधून संतापाची भावना पाहायला मिळत आहे. शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरून लोकसभा सचिवालयाच्या वतीने खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या जाहीर केलेल्या नोटिफिकेशनच्या प्रती फाडून टाकत पायदळी तुडवून या घटनेचा निषेध काँग्रेसच्या चितळे रोड कार्यालयासमोर केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी जोरदार निदर्शने कार्यकर्त्यांनी केली. “नरेंद्र मोदी हाय हाय”, “राहुल गांधी जिंदाबादच्या” घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गांधींच्या फोटोसह “डरो मत” लिहिलेले फलक कार्यकर्त्यांच्या हातात झळकत होते.
काळे म्हणाले की, निरव मोदी, ललित मोदी चोर आहेत. सगळ्या चोरांचे आडनाव मोदी कसे ? असे राहुल गांधी म्हणाले होते. सगळे मोदी आडनावाचे लोक चोर आहेत असे ते म्हणाले नव्हते. मात्र सुनियोजित कटाप्रमाणे खोटा खटला दाखल करण्यात आला. खटला अति जलद वेगाने चालविण्यात येऊन त्याचा निकाल घेत अति जलद गतीने लोकसभा सचिवालयाने देशातल्या हुकुमशांच्या आदेशाने खासदारकी रद्द केली. ही हुकूमशाही आहे. हिटलर पेक्षाही मोठ्या हुकुमशहाने भारतामध्ये जन्म घेतला आहे.
रिथ्विक प्रोजेक्ट्रससोबत शासनाचा 8160 कोटींचा सामंजस्य करार
परंतु या हुकूमशहाणे हे विसरू नये की दीडशे वर्ष देशावर जुलमी राज्य करणाऱ्या इंग्रजांना सुद्धा सामान्य भारतीयांनी पिटाळवून लावले. हिटलरचा देखील अंत वाईट झाला. हे सर्व जगाने पाहिले आहे. देशातील गॅस, खाद्यपदार्थ दरवाढ, डिझेल, पेट्रोल भाववाढ, शेतकऱ्यांचे सुरू असणारे हाल, बेरोजगारी, करांच्या बोजामुळे उध्वस्त झालेले व्यापारी, जातीय, धार्मिक तेढ यामुळे समाजातील प्रत्येक घटक हवालदिल आहे. आज केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधींची गरज नसून या देशातील १३० कोटी जनतेला गांधींच्या नेतृत्वाची गरज असल्याचे, काळे यावेळी म्हणाले.
सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महाराष्ट्र केसरी
यावेळी मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, दशरथ शिंदे संजय झिंजे, प्रवीण गीते, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, पुनम वंनंम, शैलाताई लांडे, अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, आर. आर. पाटील, मनसुख संचेती, निजाम जहागीरदार, गौरव घोरपडे, प्रशांत जाधव, आकाश आल्हाट, कल्पक मिसाळ, आनंद जवंजाळ, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, विनोद दिवटे, किशोर कांबळे, सोफियान रंगरेज, गणेश चव्हाण, रमेश देठे, अक्षय साळवे, समीर शेख, विकी भिंगारदिवे, मयूर भिंगारदिवे, राहुल चाबुकस्वार, मृणाल वाघमारे, अनिल भिंगारदिवे, अरविंद चोटीले आदींसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.