कोकणातील नाचणी आता राहुरीत, कापूस-कांद्याला दिला पर्याय, कृषी विद्यापीठाचा प्रयोग यशस्वी नगरमहाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात, घाट उतार आणि आदिवासी दुर्गम भागात घेतले जाणारे नाचणीचे पीक (Rahuri) आता राहुरी सारख्या बागाईत पट्ट्यात घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुढाकारातून नाचणी या पिकाचा राहुरी तालुक्यात प्रथमच अंतर्भाव करण्यात आला आहे. हे पीक उन्हाळी आणि खरीप हंगामात घेता येते. चांगले उत्पादन देणारे हे पीक कापूस आणि कांद्याला पर्याय ठरू शकते अस प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केलं. ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खेती बचाव अभियानांतर्गत राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत शेतकर्यांच्या शाश्वत विकासासाठी भरडधान्यांचे उत्पादन आणि काढणीनंतरची मूल्य साखळी या प्रकल्पांतर्गत शिवार फेरी व नाचणी पीक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यात उन्हाळ्यात घेतलेल्या प्रात्यक्षिकात नाचणी पिकाचे 18 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. कपाशी आणि कांद्याला या भागात हे पीक पर्यायी पीक होऊ शकते. हे पीक पौष्टिक तृणधान्यांमध्ये येत असल्याने आपल्या आरोग्यास हितकारक आहे. नाचणी हे पीक चांगले उत्पादन, उत्पन्न देणारे आणि आरोग्यवर्धक असल्याने शेतकर्यांनी याकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात हाेणार साैर ऊर्जा प्रकल्प
सुधाकर बोराळे मार्गदर्शन करताना म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नाचणी पीक येणार्या काळात वरदान ठरणार आहे. शेतकर्यांनी पारंपारिक पिके सोडून आता पीक विविधीकरण संकल्पनेकडे जाणे गरजेचे आहे. जगाला लागणारे 60 टक्के पौष्टिक तृणधान्य आपण निर्यात करतो. नागलीच्या मूल्यवर्धनासाठी पी.एम.एफ.इ. योजनेअंतर्गत विविध सवलती उपलब्ध आहेत. परदेशात विषमुक्त अन्नासाठी जास्त भर दिला जातो. आपल्याला विषमुक्त अन्नासाठी पौष्टिक तृण धान्याकडे वळणे गरजेचे आहे असल्याचंही ते म्हणाले.
आरडगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग यांनी प्रयत्न केले.कृषी विद्यापीठाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने बेभवशाच्या कांदा पिकाऐवजी आता शेतकरी नाचणीसारख्या कडधान्याचे उत्पादन घेऊ शकतात. यासंबंधी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांचे प्रबोधन होण्याची आवश्यकता असल्याचीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
