जळगावः जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील काही गावांना शुक्रवारी सकाळी भूकंपाचे ( Earthquake) धक्के बसले आहेत. भुसावळ शहर व परिसर, सावदा या भागात सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्क बसले आहेत. ३.३ रेश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्कामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या भुसावळ, सावदा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिकच्या मेरी केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.
या भूकंपामुळे कुठे नुकसान, जीवितहानी झाली नाही. हतनुर धरणाला काहीही धोका नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. सौम्य धक्के बसले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.